21 Jan 2025, 07:52 वाजता
गोंदियात शिक्षकाकडून शाळेतील विद्यार्थीनीवर अत्याचार
विद्यार्थिनीवरच शिक्षकाने वाईट नजर ठेवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरातील नामवंत हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला असून, त्या शिक्षकावर सोमवारी रात्री १ वाजता तिरोडा पोलिसांनी बाललैंगिक अधिनियमान्वये अत्याचार गुन्हा दाखल केला आहे. सुनील आत्माराम शेंडे (52, राहता गांधी वॉर्ड, तिरोडा) असे आरोपीचे नाव आहे. सुनील शेंडे दहाव्या वर्गातील 15 वर्षीय पीडित मुलीशी अश्लील चाळे करायचा. मुलगी शाळेत गेल्यावर आरोपी शेंडे तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलवायचा. संधी मिळेल त्या ठिकाणी तो तिला पकडून तिच्याशी अश्लील चाळे करायचा. अश्लील चाळे केल्यानंतर या प्रकाराची वाच्यता कुणाकडे करू नकोस, घरच्यांना काही सांगू नकोस अन्यथा याद राख. याचा भुर्दंड तुला सहन करावा लागेल, अशी धमकी देत असल्याचे मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार अधिनयमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
21 Jan 2025, 07:48 वाजता
जालना : ट्रक मालकानेच केली ट्रक चालकाची हत्या, औद्योगिक वसाहतीतील घटना
जालन्यातील औद्योगिक परिसरात असलेल्या विकास लॉज परिसरात ट्रक मालकानेच ट्रक चालकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री ही घटना घडली. अझीम जमालुद्दीन शेख, असं मयताच नाव आहे. मयत ट्रक चालक हा चंदनझीरा येथे भाड्याने राहत होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षकांसह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. ही घटना व्यक्तिगत कारणावरून झाली. आरोपीची ओळख पटली असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना केल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
21 Jan 2025, 06:50 वाजता
हाताचा उपचार करताना चुकीचे इंजेक्शन दिल्याने रुग्णाचा मृत्यू
सांगलीच्या मिरजेमध्ये एका खाजगी रुग्णालयामध्ये एका रुग्णाच्या मृत्यूच्या घटनेनंतर नातेवाईकांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे.हात फ्रॅक्चर झाल्यानंतर उपचार करताना चुकीचं इंजेक्शन दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये आक्रोश केला, त्यामुळे काही काळ रुग्णालयामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं
21 Jan 2025, 06:49 वाजता
चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एका वाघाचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एका वाघाचा मृत्यू झालाय. सिंदेवाही तालुक्यातील पांगडी जंगलात वाघाचा मृत्यू झालाय. हे जंगल ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मोडते. मृत वाघ अंदाजे 2 वर्षांचा नर असून कुवानी या वाघीनीचा पूर्ण वाढ झालेला बछडा आहे. स्वतःची टेरेटरी तयार करत असताना काही दिवसांपूर्वी या वाघाची दुसऱ्या एका वाघासोबत झुंज झाली होती. या झुंझीत हा वाघ जबर जखमी झाला होता. जखमांमुळे आज अखेर त्याचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून उद्या वाघाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम होणार आहे.
21 Jan 2025, 06:47 वाजता
घोटी सिन्नर महामार्गावर भीषण अपघातात तीन ठार दोन गंभीर जखमी
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाची समोरून येणाऱ्या कंटेनरला धडक दिल्याने नाशिकमधील घोटी-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. महामार्गावरील एस एम बी टी हॉस्पिटलजवळ अपघात झाला आहे. या अपघातामध्ये रिक्षाचालक अमोल विनायक घुगेचा मृत्यू झाला आहे. स्वरा अमोल घुगे या चार वर्षाच्या मुलीचा देखील मृत्यू झाला आहे. मार्तंड पिराजी आव्हाड (वय 60) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. जखमींना एसएमबीटी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आल आहे.
21 Jan 2025, 06:44 वाजता
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पुलाचे गर्डर्स बसविण्यासाठी तीन दिवस ट्रॉफिक ब्लॉक
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर मुंबई लेनवर लोणावळा येथे डोंगरगाव/ कुसगांव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. 22, 23 आणि 24 जानेवारी असे तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक ही जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून देहूरोड मार्गे वळविण्यात येणार आहे.
21 Jan 2025, 06:41 वाजता
अलिबागच्या समुद्रात मोठी कारवाई! 32 हजार लिटर क्षमतेचे 4 डिझेल टँकर आणि 2 बोटी जप्त
अलिबाग जवळच्या रेवदंडा खाडीत सीमा शुल्क विभागाने आज पहाटे मोठी कारवाई करत डिझेल तस्करीचा पर्दाफाश केला आहे. 32 हजार लिटर क्षमतेचे 4 टँकर आणि 2 बोटी जप्त करण्यात आल्यात. यात 5 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळतेय. अरबी समुद्रातून रेवदंडा खाडीमार्गे ही तस्करी सुरू होती. मच्छीमार बोट असल्याचे भासवून या बोटीतून डिझेलची ने आण केली जात होती. रेवदंडा पोलीस ठाण्याच्या लगत असलेल्या जेटीवरून ही ने आण होत होती. या पूर्वीही याच जेटीवर अशीच कारवाई करण्यात आली होती. तरीदेखील खुलेआम डिझेल तस्करी सुरू होती. मात्र आता सीमा शुल्क विभागाने कारवाई केल्याने डिझेल तस्करांचे धाबे दणाणले आहे. याबाबत अधिकची माहिती देण्यास सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.
21 Jan 2025, 06:40 वाजता
नाशिक: 8 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार; इमारतीत सापडला मृतदेह
नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना गंधर्व नगरी परिसरात समोर आली आहे. येथील एका 8 वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. इमारतीच्या डकमध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलगा मूकबधिर असल्यानं संशयिताने फायदा घेतला. नाशिकच्या उपनगर पोलीसांकडून गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांचे तीन पथक रवाना झाल्याची माहिती नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत
21 Jan 2025, 06:33 वाजता
ट्रम्प यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची शपथ
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
21 Jan 2025, 06:31 वाजता
अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या घरावर बँकेने जप्तीची नोटीस लावली आहे. त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी खाजगी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने ही जप्तीची नोटीस लावली आहे