वाल्मिक जोशी, झी 24 तास, जळगाव : लॉकडाऊनमुळे अनेकांचं नुकसान झालं. छोटे उद्योगधंदे काही काळासाठी बंद पडले. तर काही ठप्प झाले काही जणांच्या नोकऱ्या गेल्या. छोटे उद्योग किंवा कामं हातातून गेल्यानं जगावं कसं हा प्रश्न अनेकांसमोर उभा होता. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.
आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील 4 जणांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. चौघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडली आहे या घटनेत तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या जळगाव जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
भुसावळ शहरातील वांजोला रस्त्याजवळ राहत असलेले विलास भोळे हे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. लॉकडाऊनमुळे रिक्षा बंद होती. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली. व्यवसायही बंद राहिल्याने त्यांचावर मोठा आर्थिक ताण पडला. याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर झाला.
मुलाची हातची नोकरी गेली. तर मुलीच्या संसरात अडचणी येऊ लागल्या. तणावात वाढ होत गेल्याने काल रात्रीच्या सुमारास विलास भोळे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांनी एकाच वेळेस विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
संपूर्ण कुटुंबाने विष घेऊन आयुष्य संपवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले आणि तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या मागितीनुसार तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.