अमित जोशी, झी मीडिया, बीड : भाजपचे मित्र असलेले विनायक मेटे पंकजा मुंडेंवर रुसले आहेत. बीडमध्ये प्रितम मुंडेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिका विनायक मेटेंनी घेतली आहे. त्यामुळे बीडमध्ये भाजपाच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. आपण मुंडेंचा प्रचार करणार नसलो तरीही आपण भाजपासोबतच असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मेटेंच्या या भूमिकेमुळे मुंडे भगिनींची चांगलीच अडचण झाली आहे. आता विनायक मेटेंची समजूत काढणे हे भाजपा पक्षश्रेष्ठींसमोरचे मोठे आव्हान असणार आहे.
बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे निवडणुकीच्या रणमैदानात नसले तरी टक्कर धनंजय मुंडे विरूद्ध पंकजा आणि प्रितम अशीच आहे. काटे की टक्कर असताना गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय अशी ओळख असलेले विनायक मेटेंनी तिरकी चाल खेळल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी मेटेंनी पंकजा मुंडेंशी असहकार पुकारला आहे. बीडमध्ये मुंडे भगिनींचा प्रचार करणार नाही अशी भूमिका विनायक मेटेंनी घेतली आहे.
पंकजा मुंडे सातत्याने अपमानास्पद वागणूक देत असल्याची सल विनायक मेटेंना आहे. त्यातच जयदत्त क्षीरसागर यांच्याशी त्यांची वाढलेली जवळीक मेटेंना अजिबात रुचलेली नाही. मुख्य़मंत्र्यांनी दिलेल्या जाहीर इशाऱ्याचीही त्यांना परवा नाही. जे भाजपा सोबत आहेत त्यांना मुंडेंसोबत राहावेच लागेल असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. याचा अर्थ विनायक मेटेंपर्यंत पोहोचेल अशी आशाच आता भाजपाकडून व्यक्त होत आहे.
कमळाची साथ सोडणार नाही असे मेटे सांगतात. पण मेटेंना वाऱ्याची दिशा कळते असेही म्हटले जाते. मुंडे भगिनींशी असहकार पुकारून त्यांनी भविष्यातल्या राजकारणाची सोय तर लावली नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे.