Lok Sabha Election Survey: लोकसभेच्या 2024 (Lok Sabha Election 2024) मधील निवडणुकांसाठी वर्षभराचा काळ शिल्लक असतानाही राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र दिसत आहे. राज्यामध्ये आघाड्या, दोन पक्षांमधील युती यासंदर्भातील राजकारण चांगलेच तापले आहे. असं असतानाच 'इंडिया टुडे आणि सी व्होटर'नं (india today c voter survey) केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये विद्यमान सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टी (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) नेतृत्वाखालील शिंदे गटाला धक्का देणारा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेक्षणावर मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपानेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
'इंडिया टुडे आणि सी व्होटर'नं महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदार संघांमध्ये केलेल्या सर्व्हेतून भाजप आणि शिंदे गटाला केवळ १४ जागा मिळणार असल्याचं अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आज निवडणूक झाल्यास अच्छे दिन येतील असा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. एकीकडे भाजपा-शिंदे गटासाठी धक्कादायक आकडेवारी समोर आलेली असताना महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल असं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. ठाकरे गट आणि दोन्ही काँग्रेसला 34 जगा मिळू शकतात असं अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. याचाच अर्थ एकूण मतदानाच्या 48 टक्के मतं युपीएला मिळतील. म्हणजेच आजच्या घडीला निवडणूक झाल्यास उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला भरघोस यश मिळू शकेल, असं सर्व्हेतून समोर येत आहे.
मात्र या सर्वेक्षणाची आकडेवारी भाजपाने फेटाळून लावली आहे. भाजपा आणि शिंदे गटाला 14 जागांवर समाधान मानावं लागेल हा सर्वेक्षणामधील अंदाज चुकीचा असल्याचं भाजपा आणि शिंदे गटाने म्हटलं आहे. भाजपाने राज्यामधील लोकसभेच्या 48 जागांपैकी 45 हून अधिक जागा भाजपा-शिंदे गट युती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली आहे. आजही निवडणुका घेतल्या तर भाजपला ४५ पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा बावनकुळेंनी केला आहे.
तर बंड करुन जून महिन्यात बंडखोर आमदारांबरोबरच भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील माजी नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या सर्वेक्षणावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. शिंदेनी सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. "या सर्व्हेला अर्थ नाही कारण सॅम्पलिंगचा आधारच चुकला आहे," असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.
याचसंदर्भात उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सर्वेक्षणाचा अंदाज नक्कीच बरोबर ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.