मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना राज्यात काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागलाय. काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचं समोर आलं आहे. गटबाजीमुळे निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून संजय निरुपम यांची उचलबांगडी करून मिलिंद देवरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रपूर मतदारसंघातील नाराजीमुळे जाहीर केलेला उमेदवार काँग्रेसला बदलावा लागला आहे. औरंगाबादमध्ये पक्षाच्या ज्येष्ठ आमदारानेच बंडाचा झेंडा उगारला आहे. तर रामटेकमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी झाली आहे. त्याआधी विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच भाजपात प्रवेश केल्याने पक्षात निरुत्साह आहे. भाजपाचा मुकाबला करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनीच लोकसभा निवडणूक लढवणार नाही असा पावित्रा घेतला होता. या गोंधळात काँग्रेसला राज्यात लोकसभा निवडणुकीला सामोरं जावं लागणार असल्यानं काँग्रेस नेत्यांनाच पराभवाची धास्ती लागून राहिलीय.
सोमवारी लोकसभा निवडणूक २०१९ च्या महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन-दोन उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले आणि काँग्रेसमधला गोंधळ चव्हाट्यावर आला. काँग्रेस नेते किशोर गजभिये आणि नितीन राऊत या दोन्ही नेत्यांनी आपणच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचं सांगत उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
तर दुसरीकडे लोकसभा निवडणूक २०१९ च्या तारखा जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने अहमदनगरची जागा आपल्या मुलासाठी सोडावी, असा आग्रह राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीकडे केला होता. पण राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळली होती. त्यानंतर सुजय विखे यांनी भाजपचा रस्ता धरला. त्यानंतर राधाकृष्ण पाटील यांनीही आपण राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसल्याचं जाहीरपणे सांगितलं.
या घटनांनी काँग्रेसला राज्यात पुरतं हादरवून टाकलंय. अशा परिस्थितीत पक्षाचे निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते पक्षाची धुरा कशी सांभाळतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.