Loksabha 2024: लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. खासदारकीसाठी राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष इच्छुक उमेदवार आपला अर्ज भरु लागले आहेत. यावेळी उमेदवारांना आपली संपूर्ण माहिती, संपत्ती, दाखल असलेली सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करतात. यात जनतेत लोकप्रिय असलेल्या उमेदवारांच्या माहितीची नेहमी चर्चा होत असते. शिरुर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यापैकीच एक आहेत. छत्रपती संभाजी महाराज म्हणून घराघरात पोहोचलेल्या अमोल कोल्हेंबद्दल सर्वसामान्यांना विशेष आकर्षण आहे. दरम्यान त्यांनी भरलेल्या उमेदवारी अर्जानंतर त्यांच्या संपत्तीची चर्चा जोर धरु लागली आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध डॉ. अमोल कोल्हे अशी रंगत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीत शिरुर मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वाट्याला आला. येथे त्यांच्याकडे सक्षम उमेदवाराचा शोध सुरु होता. दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवाजीराव हे अजित पवार गटात आले. आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष आहे. अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
2019 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अमोल कोल्हे यांची संपत्ती 4 कोटी 50 लाख इतकी होती. तर 2024 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती 8 कोटी 42 लाख रुपये इतकी आहे.
अमोल कोल्हे यांनी सादर केलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 40 हजार इतकी रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 25 हजार इतकी रोख रक्कम आहे.
अमोल कोल्हे यांच्याकडे 82 लाख 39 हजार 505 रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. तर 3 कोटी 60 लाख 25 हजार 236 इतकी स्थावर मालमत्ता आहे. अमोल कोल्हे यांच्या पत्नीच्या नावे 3 कोटी 51 लाख 13 हजार 500 इतकी मालमत्ता आहे.
अमोल कोल्हे यांनी आपल्यावर असलेल्या कर्जाची माहितीदेखील सादर केली आहे. यानुसार त्यांच्यावर 2 कोटी 99 लाख 65 हजार 542 इतके कर्ज आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे पजेरो ही चारचाकी गाडी आहे. ज्याची किंमत 28 लाखांपासून सुरु होते. तर बुलेट हे दुचाकी वाहन आहे. याची किंमत साधारण 1 लाख 80 हजारापासून सुरु होते.
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव (कोल्हेमेळा) येथे अमोल कोल्हेंच्या नावे शेतजमीन आहे.
तर पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, मुंबईतील परळ-भोईवाडा आणि नाशिकमध्ये देवताळी येथे आपल्यानावे सदनिका असल्याची माहिती डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणूक आयोगाला दिली आहे.