Vijay Shivtare on Ajit Pawar: बारामती लोकसभा (Baramati LokSabha) मतदारसंघावरुन शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. विजय शिवतारे अजित पवारांवर गंभीर आरोप करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे गटाला इशारा दिला आहे. यादरम्यान आज त्यांनी आपण बारामती लोकसभा लढणार असल्याचं जाहीर करत महायुतीत मिठाचा खडा टाकला आहे. तसंच पुन्हा एकदा अजित पवारांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. या रामायणात रावणाविरोधात लढणारा आणि रामासोबत असणार विभीषण मी आहे अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
"2021 च्या निवडणुकीत मी अजित पवारांच्या मुलाच्या विरोधात प्रचार केला होता. तो राजकारणाचा भाग होता. पण त्यांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली होती. मी 23 दिवस लिलावतीत दाखल होतो. मला बायपास करायला सांगितली असता मी केली नव्हती. मी रुग्णवाहिकेतून प्रचार केला होता. अजित पवारांनी मरायला आले असताना, कशाला निवडणूक लढवत आहात असं म्हणाले आहेत. तुम्ही सहानुभूती मिळवत असून खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता. इतकंच नाही तर माझ्या गाडीचा नंबर मिळवला होता. अजित पवार खालच्या थराला गेले होते," अशी जहरी टीका विजय शिवतारे यांनी केली आहे.
"अजित पवार म्हणाले होते, तू पुन्हा कसा निवडून येतो हे पाहतो. मी कोणाला पाडायचं ठरवलं तर कोणाच्या बापाचं ऐकत नाही. राजकारणात एखाद्याला निवडून आणण्याची सकारात्मक प्रवृत्ती हवी. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो, पण वसवायला अनेक लागतात. अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती. त्या उर्मट भाषेसाठी मी माफ केलं आहे. ते महायुतीत आल्यानंतर मी त्यांचा सत्कारही केला होता. पण तरीही त्यांची उर्मी तशीच होती," असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
बारामतीमधील 5 लाख 80 हजार मतदार पवार विरोधक आहे. ते सुप्रिया सुळे, सूनेत्रा पवार यांना मत देऊ इच्छित नाहीत. त्यामुळे मतदारांना आवडत्या उमेदवाराला मत देण्याची संधी मिळायला हवी. पुरंदरचे लोक म्हणतात आम्हाला बदला घ्यायचा आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला अशी माहिती विजय शिवतारे यांनी दिली.
शरद पवार जेव्हा नातवाच्या बोलण्याला कवडीमोलाची किंमत नाही म्हणाले तेव्हा सगळं संपलं. जेव्हा तुम्हाला घर सोडून जावं लागलं तेव्हा सगळं संपलं. पहाटेचा शपथविधी घ्यावा लागला तेव्हाच संपलं. आज काय स्थिती आहे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे बारामतीत लोकशाहीला मानणाऱ्या आणि घराणेशाही, कुटुंबशाही, साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मी ही निवडणूक लढणार म्हणजे लढणार असा निर्धार विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे.
"सगळ्यांना यांनी त्रास दिला आहे. भोरचे आनंदराव थोपटे 1999 मध्ये मुख्यमंत्री झाले असते. पण साम्राज्याला हादरा बसेल म्हणून होऊ दिलं नाही. अजित पवारांनीच संग्राम थोपटे यांना मंत्री होऊन दिलं नाही. आम्हीच पुण्याचे मालक अशी यांची मानसिकता आहे. ती मोडली पाहिजे. फसवेगिरी करणं आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे अशा अविर्भावात असतात. यांना कसलाच पश्चाताप नाही," असा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे.
पार्थ पवारांच्या वेळी अजित पवारांनी हवा केली होती. पण लोकांनी त्यांना दाखवू दिलं होतं. आम्ही 41 वर्ष मतदान करतोय, तुम्ही पुरंदर, भोर, दौंड, इंदापूरला काय दिलं आहे? पंतप्रधानांना आल्यावर बारामती दाखवता. बारामती बागायत ब्रिटीशकालीन आहे, पवारांनी केलेलं नाही. त्यामुळे या लोकशाहीत कोणीतरी धाडस केलं पाहिजे असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
"आम्हीच मतं देऊन हा ब्रह्मरक्ष आम्हीच तयार केलेला आहे. या पापाचा पश्चाताप आम्हाला करावं लागेल. या रामायणात रावणाविरोधात लढणारा आणि रामासोबत असणार विभीषण मी आहे. ही लढाई खासदार होण्यासाठी नाही. मला देवाने सगळं दिलं आहे. मला सर्वसामान्यांचा आवाज म्हणून पुढे यायचं आहे. मी महायुतीच्या विरोधात नाही. मी शिंदेंच्या विचारांचा शिलेदार आहे. मी नरेंद्र मोदींना मानणारा आहे. त्यांच्या हातात तिसऱ्यांदा देश गेला पाहिजे. पण येथील लढाई वेगळी आहे. एक कोणीतरी आलाय तो ब्रम्हराक्षस आहे. हे बंड नाही ही न्यायाची लढाई आहे," असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
अजित पवारांची पत्नी म्हणून आम्ही मतदान का करायचं? अशी विचारणाही त्यांनी केली. 2024 ची विधानसभा हे सगळे वेगळे लढतील असाही दावा त्यांनी केला. अजित पवार हे जिंकू शकत नाहीत असंही ते म्हणाले. या लढाईत मी विभीषण आहे तर रावण कोण असेल हे सगळ्यांना माहीत आहे असं म्हणत अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला.