जालना : कोरोना ( Coronavirus) काळात खासगी रुग्णालयांकडून (Private hospitals) लूट सुरुच आहे. ( Coronavirus in Maharashtra) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या बघता चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसामान्यांना कोरोनाचे उपचार करणे अवघड झाले आहे. काही खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांची कोरोना उपचाऱाच्या नावाखाली भरमसाठ बिल आकारणी करुन लूट सुरुच आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने लूट करणाऱ्यांना दणका दिला आहे. कोरोना रुग्णांकडून जास्तीचे आकारलेले 17 लाख 12 रुग्णालये परत करणार, असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.
जालना शहरातील 12 रुग्णालयांनी कोरोनाच्या उपचारासाठी 291 रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा 17 लाख रुपये जास्त आकारल्याच समोर आले आहे.या प्रकरणी जिल्हाधिकारी या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्यानंतर अखेर या रुग्णालयांचे प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक झाली.या बैठकीत रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा जास्तिचे आकारलेले 17 लाख रुपये रुग्णांना परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सात दिवसांत रुग्णांकडून जास्तीचे आकारलेले 17 लाख रुपये रुग्णालये परत करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
कोरोना महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या बालकांची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे. कोरोनामुळे ज्या बालकांचे आई, वडील असे दोघे किंवा दोघांपैकी एका जणांचा मृत्यू झाला आहे. अशा बालकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाचीच आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अशा बालकांचं पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या चाईल्ड हेल्पलाईनवर संपर्क साधावा कोणत्याही सामाजिक संस्थेच्या भूलथापांना बळी पडू नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.