मुंबई - मंत्रालयातील कॅंटिनसाठी वेटर हवेत, अशी जाहिरात दिल्यावर आलेल्या अर्जांचा आकडा पाहून तुम्ही थक्क व्हाल. पण त्यापेक्षा जास्त थक्क होण्याची वेळ या पदासाठी अर्ज करणारे सर्वाधिक तरुण-तरुणी पदवीधर आहेत, या गोष्टीमुळे तुमच्यावर येईल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने केवळ चौथी पास असणे आवश्यक आहे. असे असतानाही पदवीप्राप्त ७००० जणांनी कॅंटिनमधील वेटर पदासाठी अर्ज केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मंत्रालयातील कॅंटिनमध्ये वेटरच्या एकूण १३ जागा रिक्त आहेत. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कॅंटिनमधील वेटर पदासाठी नुकतीच १०० मार्कांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी पात्र होण्यास उमेदवाराने चौथी पास असणे अनिवार्य होते. पण पदवी घेतलेल्या हजारो तरुणांनी या पदासाठी अर्ज केला. ३१ डिसेंबरला परीक्षेची प्रक्रिया पूर्ण झाली. सध्या निवड झालेल्या उमेदवारांना कामावर रुजू करून घेण्यात येत आहे. निवडलेल्या १३ जणांपैकी ८ जण पुरुष आहेत. तर उर्वरित पाच महिला आहेत. अजून दोन ते तीन जणांनी आपली सर्व कागदपत्रे जमा केलेली नाहीत. त्यामुळे त्यांना रुजू करून घेण्यात आलेले नाही.
या पदासाठी निवड करण्यात आलेल्या एकूण १३ जणांपैकी १२ जण पदवीधर आहेत. तर एक जण बारावी उत्तीर्ण आहे. निवडण्यात आलेले सर्वजण २५ ते २७ वयोगटातील आहेत. दरम्यान पदवी शिक्षण घेतलेल्या तरुण-तरुणींना मंत्रालयातील कॅंटिनमध्ये वेटर म्हणून घेणे ही राज्य सरकारची कृती लाजीरवाणी आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. १३ जागांसाठी ७००० अर्ज येतात, यावरूनच राज्यात रोजगाराची स्थिती किती भीषण आहे, याचा अंदाज येतो. सरकारमधील मंत्री, सचिवांना पदवी घेतलेल्या मुलांच्या हातून चहा, नाश्ता घेताना काय वाटते, हे बघायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.