Ajit Pawar NCP Design Boxed Naresh Arora Controversy: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवलं असलं तरी त्यांच्या या विजयाला गालबोट लागलं आहे ते त्यांच्यासाठी काम करणाऱ्या पीआर एजन्सीसंदर्भात सुरु असलेल्या वादामुळे. अजित पवारांसाठी निवडणुकीचं संपूर्ण कॅम्पेन 'डिझाइन बॉक्स' या कंपनीने राबवलं. अजित पवारांनी विधानसभेमधील विजयानंतर या कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांच्यासहीत एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये अजित पवार नरेश अरोरा यांचं अभिनंदन करताना दिसत आहेत. मात्र फोटोत अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवल्याचं दिसत आहे. यावरुनच वादाला तोंड फुटलं आहे.
अजित पवारांच्या खांद्यावर अरोरा यांनी हात ठेवलाच कसा? असा सवाल पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी उपस्थित केला. 'डिझाइन बॉक्स' कंपनी विजयाचं श्रेय घेऊ पाहत असल्याचा आरोपही मिटकरींनी केला होता. अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवल्याप्रकरणी अरोरा यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. मात्र या प्रकरणावरुन आता अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी मिटकरींनाच सुनावलं आहे. पार्थ पवार यांनी आपण आणि अजित पवार मिटकरींच्या मताशी समहत नसल्याचं सोशल मीडियावरील पोस्टमधून जाहीर केलं आहे. अमोल मिटकरींनी अशी विधानं करु नयेत असंही त्यांनी म्हटलं आहे.
"पक्षाचे आमदार असूनही अमोल मिटकरींनी पक्षाविरुद्ध तसेच डिझाइन बॉक्स आणि नरेश अरोरा यांच्याविरुद्ध भूमिका घेणं फारच दुर्देवी आहे. माझा पक्ष, माझे वडील तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यासंदर्भात कोणत्याही प्रकारे मिटकरींच्या विधानाशी सहमत नाहीत. त्यांनी अशाप्रकारची विधान करु नयेत. या प्रकरणामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलू नये," असं पार्थ पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
It is highly unfortunate that Mr. @AmolMitkari22 despite being a party MLC, has chosen to take an anti-party stance regarding the role of @DesignBoxed and Sh. Naresh Arora. My party and my father, Sh. @AjitPawarSpeaks, the National President of the party, categorically does not…
— Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) November 27, 2024
पार्थ पवारांच्या या पोस्टखाली अनेकांनी अमोल मिटकरींना टॅग करुन प्रतिक्रिया नोंदवली असून हा मिटकरींचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. "किती हो अपमान... 200 कोटी रुपये चार्ज करणारी एजन्सी तुमच्यापेक्षा लाडकी?" असा सवाल एकाने विचारला आहे. तर अन्य एकाने, 'अमोल मिटकरी ही आपली लायकी,' म्हणत अजित पवारांच्या आमदाराला डिवचलं आहे. अन् एकाने, "आम्हाला ब्लॉक करून काही फायदा नाही झाला त्यांचेच लोक त्यांना उघड करत आहेत," असं म्हटलं आहे. एकाने तर अमोल मिटकरींना टॅग करुन, "मी असतो तर एवढं ऐकुन घेतलं नसतं," असं म्हटलं आहे. एकाने तर पार्थ पवारांना, 'माझा पक्ष' की 'आमचा पक्ष?'" असा सवाल केला आहे.
आता पार्थ पवार यांनी व्यक्त केलेल्या या मतावर मिटकरी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.