2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?

Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: राज ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठी राजकीय खेळी केल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 29, 2024, 11:27 AM IST
2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?  title=
पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष

Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या एका भन्नाट राजकीय खेळीने वांद्रे पूर्व मतदारसंघातील निवडणूक अधिक रंजक झाली आहे. मनसेनं ऐनवेळी या मतदारसंघातून एक तगडा उमेदवार दिला असून या उमेदवारीमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि ठाकरे कुटुंबियाचे नातेवाईक असेलल्या वरुण सरदेसाईंचा मार्ग अधिक खडत झाला आहे. तसेच अजित पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या झिशान सिद्दीकींनाही राज ठाकरेंच्या या खेळीमुळे तगडं आव्हान मिळणार आहे.

मनसेचा एबी फॉर्म घेतल्याच्या वृत्ताला स्वत: दिला दुजोरा

मनसेनं शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे तृप्ती सावंत यांनी अवघ्या पाच वर्षांच्या आत भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देत मनसेमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेश केल्याच्या वृत्ताला स्वत: तृप्ती सावंत यांनी दुजोरा दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना तृप्ती सावंत यांनी, "आज मी राज ठाकरेंच्या नेतृत्वात एबी फॅार्म स्वीकारला आहे. आज गेली 9-10 वर्ष आम्ही काम करत आहोत. आणि स्थानिकांचा आवाज बनत आहोत. त्याच जोरावर आजही आम्ही काम करत आहोत. एका महिलेला डावलले जात आहे. स्थानिकांचा आवाज म्हणून मी लढत राहील," असं म्हणत पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

राणेंसारख्या बड्या नेत्याला पराभूत करुन बनल्या जायंट किलर

तृप्ती सावंत हे वांद्रे येथील राजकारणामधील मोठं नाव आहे. खरं तर त्या पतीच्या निधानंतर म्हणजेच 2015 नंतर राजकारणात सक्रीय झाल्या. तृप्ती सावंत यांनी लढवलेली 2015 मधील वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक गाजली होती. शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार बाळा सावंत यांचं निधन झालं. त्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. त्यावेळी शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती. 2015 च्या निवडणुकीत तृप्ती सावंत यांच्याविरोधात काँग्रेसकडून नारायण राणेंना रिंगणात उतरण्यात आलं होतं. थेट 'मातोश्री'ला चॅलेंज देण्यासाठी नारायण राणे यांनी शड्डू ठोकला होता. आधी एकतर्फी वाटणारी आणि सहानुभूतीच्या लाटेवर असणारी ही निवडणूक, चांगलीच चुरशीची झाली होती.

'मातोश्री'च्या अंगणात नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं होतं. या निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी जवळपास 20 हजारांच्या फरकाने नारायण राणेंचा पराभव केला होता. तृप्ती सावंत यांच्या विजयानंतर त्यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष करताना हद्द पार केली होती. शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करताना हातात कोंबड्या घेऊन राणेंविरोधात घोषणा दिल्या जात होत्या. काही वर्षांपूर्वी याच पराभवावरून अजित पवार यांनीदेखील नारायण राणेंची खिल्ली उडवली होती. 'बाईनं पाडलं बाईन' अशा शब्दात अजित पवारांनी राणेंची खिल्ली उडवली होती.

यापूर्वीही शिवसेनेच्या पराभवासाठी ठरल्यात कारणीभूत

2019 मध्ये शिवसेनेनं उमेदवारी नाकारल्याने तृप्ती यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढल्याने शिवसेनेला मोठा फटका बसला होता. वांद्रे पूर्वमध्ये म्हणजेच 'मातोश्री'च्या अंगणात तृप्ती यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं. वांद्रे पूर्व येथील शिवसेनेचे उमेदवार दिवंगत विश्वानाथ महाडेश्वर यांचा झिशान सिद्दीकि यांनी पराभव केला होता. या पराभवासाठी त्यावेळी अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या आणि मोठ्या प्रमाणात मतं मिळालेल्या तृप्ती सावंत जबाबदार असल्याचं सांगितलं गेलं. आता याच तृप्ती सावंत यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा 'मातोश्री'च्या अंगणातील पराभवानंतर तृप्ती या मनसेमध्ये जाणार असल्याने हा ठाकरे गटासाठी भविष्याच्या दृष्टीने धोक्याचा इशारा मानला जात आहे. 

ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार फटका

2019 च्या निवडणुकीनंतर तृप्ती यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. तृप्ती सावंत शिवसेनेचे माजी दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. त्यांनी आता राज ठाकरेंच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तृप्ती सावंत यांना मनसेकडून उमेदवारी मिळाली असून त्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दीकींविरुद्ध लढणार आहेत. मात्र या निर्णयामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वरुण सरदेसाईंचं टेन्शन वाढणार आहे. तृप्ती सावंत यांना मनसेनं उमेदवारी दिल्याने त्यांना या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळू शकतो असं मानलं जात आहे. तृप्ती यांच्यामुळे मराठी मतांचं विभाजन होईल असं म्हटलं जात आहे. तृप्ती वांद्रे पूर्वमधून निवडणूक लढवत असल्याने येथील निवडणूक तिहेरी झाली आहे.