Amit Shah on Devendra Fadnavis: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून प्रचारांचा धुरळा उडत आहे. महायुतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील महाराष्ट्रात प्रचारासाठी आले आहेत. यादरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा रंगली आहे. सांगलीतील प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तसे संकेत दिले आहेत. तर याचा अर्थ एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवारांना (Ajit Pawar) यापुढे संधी मिळणार नाही असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
"20 तारखेला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. त्यात तुम्हाला निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. मी दीड महिन्यापूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला होता. विदर्भ, मुंबई, कोकण, कोल्हापूर, जळगाव, उत्तर महाराष्ट्र जिथं कुठे मी गेलो तिथे महायुतीचं सरकार बनवायचं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी विजयी करायचं आहे," असं अमित शाह म्हणाले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर बोलताना सांगितलं की, "महाराष्ट्राचं महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन कोणतीही चढाओढ नाही. आम्ही 14 कोटी जनतेच्या विकासाचा संकल्प घेऊन काम करत आहोत. आम्ही विकासासाठी काम करत आहोत. महाविकास आघाडीत 14 मुख्यमंत्री झाले असून, त्यासाठी ते लढत आहेत. आम्ही तर महाराष्ट्राच्या विकासासाठी मत मागत आहोत. केंद्रीय आणि राज्याचं नेतृत्व एकत्र बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेईल," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
"भारतातील सर्वात मोठं बंदर महाराष्ट्रात तयार होत आहे. पायाभूत सुविधांच्या नवा प्रकल्पांमुळे महाराष्ट्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. मी पायाभरणीसाठी आलो होतो तेव्हा आमच्या देवेंद्रजींनी लोकांमध्ये एक इच्छा व्यक्त केली होती. हिंदुस्थानमधील सर्वात मोठं बंदर उभं राहत आहे. मोदीजी इतकं करत आहात, हजारो कोटी लावत आहात तर तिथे एक विमानतळही तयार करा असं ते सांगत होते. त्या दिवशी तर मी शांत होतो. पण आचारसंहिता संपताच, महायुतीचा शपथविधी होताच मी महाराष्ट्र सरकारसह बसून देवेंद्रजींची इच्छा पूर्ण कशी होईल यासाठी काम करेन," असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.