Maharashtra Assembly Election: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावर चर्चा सुरु आहे. जागा वाटपावरुन मित्रपक्षांमध्ये वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान अजित पवारांनी महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. अजित पवारांनी साताऱ्यामधील फलटण विधानसभा मतदार संघातील उमदेवार जाहीर केला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी फोनवरुन उमेदवार जाहीर केला.
फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला अजित पवारही हजेरी लावणार होते. पण काही कारणास्तव ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. यादरम्यान त्यांनी फोनवरुन उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केली. अजित पवार यांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली.
फलटण मतदारसंघात विद्यमान आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) हेच उमेदवार असतील असं अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हासोबत मतदारांनी राहावं असं फोनवरून अजित पवारांनी सांगितलं. महायुतीचा जागावाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असताना अजित पवारांनी मात्र फलटण मतदार संघाचा उमेदवार जाहीर केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
"विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुमचे गाव फलटण विधानसभा मतदारसंघात आहे. या मतदारसंघात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण हे उमेदवार आहेत. तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि सहकार्य करावे. त्यांना संधी दिल्यानंतर तुमच्या मतदार संघ अन् जिल्ह्यासाठी लागणारा करोडो रुपयांचा निधी देईन. माझ्यावर विश्वास ठेवावा. मायमाऊलींना भाऊबीजेची ओवाळणी दिल्याशिवाय तुमचा भाऊ गप्प बसणार नाही," असं अजित पवार म्हणाले.
विधानसभेसाठी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा खूप पुढे गेलीय. जागा वाटपात आम्ही महाविकास आघाडीच्या कोसो दूर पुढे सहमतीवर आलो असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. चर्चा अतिशय समाधानकारक असून 288 जागा लढायच्या आणि बहुमत आणायचं या दृष्टीकोनातून चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. महायुतीचे विभाग निहाय मेळावे आणि जिल्हास्तरीय बैठका यांचे नियोजन पुढच्या काही दिवसात केलं जाईल, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं