Pravin Darekar Jahir Sabha Interview With Zee 24 Taas : भाजप नेते प्रविण दरेकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्राला निधी का मिळाला नाही याबाबत खुलासा करताना प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. 'झी 24 तास'च्या जाहीर सभा कार्यक्रमात प्रविण दरेकर यांनी अवेक प्रश्नांची रोखठोक उत्तरे दिली. यावेळी प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
कुठल्याही सरकारी योजनांचे पैसे हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात. मात्र, राज्यात भाजपची सत्ता असते तेव्हा केंद्राकडून तात्काळ निधी मिळतो. मात्र, इतर पक्षांचे सरकार असते तेव्हा केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारकडून निधी मिळत नाही असा आरोप केला जातो. असा प्रश्न प्रविण दरेकर यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या माध्यमातून लोकांना मदत झाली पाहिजे अशा प्रामाणिकपणाच्या भावनेतून आम्ही काम करतो. आमच्याकडे पैसा उभं करण्याची क्षमता आहे. आमच्याकडे डोकं आहे.
उद्धव ठाकरेंचे सरकार होते तेव्हा महाराष्ट्रासाठी पैसे मागायला किती वेळा ते दिल्लीला गेले? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. अनेक योजना केंद्र सरकारमार्फत चालवल्या जातात. यात 50 टक्के निधी हा केंद्र सरकराचा तर, 50 टक्के निधी हा राज्य सरकारचा असतो. उद्धव ठाकरे सत्तेत असताना त्यांच्या सरकारने अनेक चांगल्या योजना होऊ दिल्या नाहीत असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.
सरकार हे काही नफा कमावणारी कंपनी नाही. अनेक सरकार असतात त्यांची कर्ज उपलब्ध करण्याची क्षमता असते. आपल्या राज्याकडे कर्ज उपलब्ध करण्याची मोठी क्षमता आहे. आपलं राज्य उत्तम अर्थ व्यवस्था असलेले राज्य आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून केंद्राकडून भरघोष निधी मिळवला जात आहे.