Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत दोस्तीत कुस्ती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अनेक मतदारसंघात एका मित्रपक्षाचा उमेदवार असतानाही दुसऱ्या मित्रपक्षानं उमेदवार दिलाय. यातले काही उमेदवार माघार घेतील तरीही अनेक ठिकाणी दोस्तीत कुस्ती होणार हे नक्की झालंय.
महाविकास आघाडी आणि महायुतीनं मैत्रीच्या कितीही आणाभाका घेतल्या तरीही राज्यात ठिकठिकाणी दोस्तीत कुस्ती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अनेक मतदारसंघात मित्रपक्षांनी दावा केला होता. काही दावे चर्चेतून निकाली काढण्यात आले. तरीही अनेक ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. जागावाटप करताना महायुतीनं अमित शाहांच्या साक्षीनं जागा ठरवून घेतल्यात त्यामुळं मित्रपक्षांच्या उमेदवारांना माघार घ्यायला सांगण्यासाठी बैठक घेणार असल्याचं राष्ट्रवादीनं सांगितलंय.
महाविकास आघाडीतही मित्रपक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडलेली नाही. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सगळं नियंत्रणात आणू अशी ग्वाही काँग्रेसनं दिलीय.
मैत्रीपूर्ण लढत या गोंडस नावाखाली मित्र-मित्रच एकमेकांना आव्हान देतायत. या मैत्रीपूर्ण लढतींचा परिणाम महायुती आणि महाविकास आघाडीच्या इतर मतदारसंघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरुड मोर्शी मतदारसंघात
राष्ट्रवादीचे देवेंद्र भुयार उमेदवार आहेत.
तिथं भाजपनं उमेश यावलकरांना उमेदवारी दिलीय.
दिंडोरी मतदारसंघात
राष्ट्रवादीनं नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी दिलीय.
तिथं शिवसेनेच्या धनराज महालेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
आष्टी मतदारसंघात
राष्ट्रवादीनं बाळासाहेब आजबेंना उमेदवारी दिलीय.
तिथं भाजपनं सुरेश धस यांना उमेदवारी दिलीय.
पंढरपूर मतदारसंघात
काँग्रेसनं भगीरथ भालकेंना उमेदवारी दिलीय.
त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं अनिल सावंतांना उमेदवारी दिलीय.
भूम-परांडा मतदारसंघात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रणजित पाटील यांना उमेदवारी दिलीय.
तिथं राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं राहुल मोटेंना उमेदवारी दिलीय.
सोलापूर दक्षिण मतदारसंघात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अमित पाटील यांना उमेदवारी दिलीय.
तर काँग्रेसनं दिलीप मानेंना रिंगणात उतरवलंय.