Jalna Murder Case: राज्यात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जवळच्या नात्यातील लोकांकडूनच कधीकधी विश्वासघात होतो. तर, कुटुंबातील वादाने वेगळे रुप घेतल्यास असे गुन्हे घडतात. जालन्यातही अशीच एक घटना घडली आहे. एका क्षुल्लक गोष्टीमुळं काकानेच पुतण्याचा खून केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे, मौजपुरी गावातील ही घटना आहे. तर, या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आले आहे तर दोन जण फरार आहेत. (Jalna News In Marathi)
जालना जिल्ह्यातील मौजपुरी गावात राहत असलेल्या डोंगरे कुटुंबीयांची शेती आहे. या शेतीच्या वाटण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, शेतात एकच सामायिक विहिर आहे. या विहिरीच्या पाणी वाटणीवरुन काका आणि पुण्यात वाद झाला. या वादातून काकाने पुतण्याची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. 25 वर्षीय योगेश डोंगरे असं मयत तरुणाचे नाव आहे.
सोमवारी सकाळी सामायिक विहिरीच्या पाणी वाटपावरून योगेश आणि त्यांच्या काकांमध्ये वाद झाला होता. मात्र, तेव्हा गावकऱ्यांनी मध्यस्थी करुन त्यांच्यात झालेला वाद मिटवला होता. मात्र, योगेशच्या काकांच्या मनात याचा राग धुमसत होता. वाद मिटल्यानंतरही रात्री उशीरा बाहेर गावी राहत असलेल्या काकाने मौजपूरी गावात आले. यावेळी ते त्यांच्या तीन भावांनाही घेऊन आले होते.
तीन भावांच्या मदतीने त्यांनी योगेश डोंगरे यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीर योगेच याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या मारहाणीत योगेशची पत्नी शिल्पा ही गंभीर जखमी झाली आहे तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल करून 5 जणांना अटक केली. तर दोन आरोपी फरार झाले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र, एकाच कुटुंबात झालेल्या या वादामुळं आणि नंतर हत्या करण्यात आल्याच्या प्रकारामुळं गावात एकच खळबळ माजली आहे.