सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : पीएचडी मिळवण्यासाठी कसे नियम वाकवले जातात. माजी मंत्र्यासाठी कशी व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जाते याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhobale) हे शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि भाजपचे ज्येष्ठ नेतेही आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री ते राहिलेत. त्यांनी PhD केली तर त्यात वावगं काय असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.. मात्र थांबा. लक्ष्मणराव ढोबळे PhD करतायत ही समस्या नाही. तर एका PhD साठी सर्व यंत्रणा कशी राबवली जाते याचं धक्कादायक वास्तव झी 24 तास तुमच्यासमोर मांडणार आहे.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पुन्हा एकदा PhD परीक्षा देतायत. तसा याआधीसुद्धा त्यांनी प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले. गेल्या वर्षी याच परीक्षेत तिन्ही विषयांमध्ये ते नापास झाले होते. हे आम्ही म्हणत नाही तर ते रिपीटर असल्याचा उल्लेख त्यांच्याच हॉल तिकीटवर आहे. यंदा मात्र काहीही करुन PhD पास करायचं असं त्यांनी ठरवलं. मग झाडून यंत्रणा कामाला लागली.
सोलापूर विद्यापीठात 22 ते 26 जुलै 2024 दरम्यान PhD संशोधकांची सर्व विषयांसाठीची कोर्स वर्क परीक्षा पार पडली. सर्वांसाठी विद्यापीठातल्या संगणक शास्त्र संकुलाचं केंद्र होतं. मात्र यात लक्ष्मण ढोबळेंना स्पेशल ट्रिटमेंट देण्यात आली. ढोबळेंसाठी फक्त एकट्यासाठी सुरुवातीला पंढरपुरातल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात सेंटर देण्यात आलं. मात्र रयतशिक्षण संस्थेतलं हे सेंटर परत बदलण्यात आलं. लक्ष्मण ढोबळेंसाठी परीक्षा विभागाने न्यू सातारा कॉलेज ऑफ बीसीए, पंढरपूर या खाजगी महाविद्यालयात व्यवस्था केली. म्हणजे संपूर्ण सेंटरवर लक्ष्मण ढोबळे हे परीक्षा देणारे एकमेव विद्यार्थी होते.
हा प्रकार इथवरच थांबत नाही. तर एकमेव सेंटरवर पीएचडी परीक्षा देण्यासाठी लक्ष्मण ढोबळेंना लेखनिकही उपलब्ध करुन देण्यात आला. आता लेखनिक घेताना माजी मंत्र्यांनी दिव्यांगाचं प्रमाणपत्र देऊन लेखनिक घेतला. म्हणजे त्यांनी कारण दिलं होतं ते हात थरथरण्याचं. लेखनिक घेण्यासंदर्भातल्या पत्रात स्पष्ट लिहिलंय की उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक देणेबाबत. आणि दिव्यांगाचा तपशील लिहिलाय त्यात कारण आहे हात थरथरणे. त्यामुळेच लक्ष्मण ढोबळेंना लेखनिक उपलब्ध करुन देण्यात आला. म्हणजे लक्ष्मण ढोबळेंनी परीक्षेला लेखनिक घेताना दिव्यांग असल्याचा उल्लेख केलाय. लक्ष्मण ढोबळेंनी मात्र आपण दिव्यांग असल्याचा फायदा घेतला नसल्याचा दावा केला.
बरं हा लेखनिक म्हणजे आनंद मधूकर मसलखांब हा विद्यार्थी सोलापूरमधल्याच दयानंद महाविद्यालयात शिकतोय. हा विद्यार्थी MA भाग एकचा गुणवत्ताधारक विद्यार्थी आहे. शिवाय MAचा आणि पीएचडी कोर्स वर्कचा अभ्यासक्रम सारखाच आहे. आता हा विद्यार्थी ज्या दयानंद महाविद्यालयात शिकतो त्याच महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक देविदास गायकवाड हेच माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंचे पीएचडी मार्गदर्शक आहेत. सर्वसामान्यपणे अभ्यासक्रमापेक्षा कमी शिक्षण असणारा विद्यार्थी लेखनिक असावा असा संकेत आहे.
याचमुळे अनेक सवाल निर्माण होतायत. अगदी पूजा खेडकरांच्या प्रकरणातही बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करण्यात आला होता. पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतलं होतं. डावा गुडघा सात टक्के कायमस्वरूपी अधू असल्याचं या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलं होतं. आता हात थरथरणे या एकमेव कारणाखाली लक्ष्मण ढोबळेंना दिव्यांगाचा लाभ देण्यात आलाय. ढोबळेंना दिव्यांग प्रमाणपत्रामुळे लेखनिक पुरवण्यात आला. हा लेखनिकसुद्धा MA भाग एकचा गुणवत्ताधारक विद्यार्थी होता.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंसाठी स्वतंत्र सेंटर, दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ, त्यानंतर मग गुणवत्ताधारक लेखनिक, अशा अनेक सोयी ढोबळेंच्या पीएचडीसाठी देण्यात आल्यात का असा सवाल उपस्थित होतोय. नियम वाकवून IAS झालेल्या पूजा खेडकरांचं प्रकरण चर्चेत आहे. आता शिक्षणाची सर्वोच्च पदवी मानल्या गेलेल्या पीएचडीसाठी नियम वाकवले जातात का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय..