तुला बोलता येत नसेल तर.... एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका

Narayan Rane : उद्धव ठाकरे याचं नाव महाराष्ट्राने घेऊ नये कारण उद्धव ठाकरे याने महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही. कोकणात यापुढचे आमदार खासदार भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाचे असतील, असेही नारायण राणे म्हणाले.

Updated: Feb 18, 2023, 06:43 PM IST
तुला बोलता येत नसेल तर.... एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका title=
(फोटो सौजन्य - PTI)

प्रताप नाईक, झी मीडिया, सिंधुदुर्ग : बहुमताच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिंदे गटच शिवसेना असल्याचा निर्णय शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिला आहे. यासोबतच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह देखील बहाल केले आहे. यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयुक्तांनी शेण खाल्लं अशा शब्दात या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. ते सिंधुदुर्गात कुणकेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

"तुला बोलता येत नसेल तर बोलू नको, गप्प बस. उद्धव ठाकरे हा संपलेला आहे. त्याचं काहीही अस्तित्व राहिलेलं नाही. त्याने शिवसेनेचा प्रमुख असताना शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखी चालवली. मातोश्री प्रॉपर्टी म्हणून चालवली. मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी शिवसेना चालवली नाही," बोचरी टीका नारायण राणे यांनी केली. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही

"हिंदुत्वाची तडजोड करून मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांनी काहीही बोलू नये. हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या नावावर उद्धव ठाकरे यांनी फक्त पैसे कमावले, त्याच्या पलीकडे त्याने काही नाही केलं. गेल्या अडीच वर्षात त्यांनी कोकणाला काय दिलं? त्यामुळे उद्धव ठाकरे याचं नाव महाराष्ट्राने घेऊ नये कारण उद्धव ठाकरे याने महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही. कोकणात यापुढचे आमदार खासदार भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाचे असतील," असाही दावा नारायण राणे यांनी केला आहे.

शिवसेना राहू नये असं वाटत होतं 

"मी शिवसेनेचा त्याग 2005 साली केला. पण आता मला वाटते त्यावेळेला घेतलेला निर्णय योग्य होता. शिवसेना ही शिवसेना राहिलेली नाही. ती आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असून तिथं मराठी माणसाला ना हिंदुत्वाला न्याय मिळत नाही. जी शिवसेना मराठी माणसाची नाही ती राहू नये असं वाटत होतं. पण ती एकनाथ शिंदेंकडे गेली आहे, त्यामुळे मराठी माणसाला आणि हिंदुत्वाला यापुढे न्याय मिळेल," असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.

मुलाच्या आणि पत्नीच्या पलीकडे उद्धव ठाकरेंना काही दिसलं नाही

"आमचा अभ्यास असून आम्ही ज्योतिष आहोत. त्यांनी ज्योतिष विचारलं नाही. ते सगळं उलट करत होते, कारण त्यांचे ज्योतिष सांगणारा वेगळा आहे. उद्धव ठाकरे यांना मराठी माणूस सांभाळता आला नाही, जे माज्या सोबत झालं तेच एकनाथ शिंदे सोबत झालं. आम्ही उद्धव ठाकरेंच्या स्वभावामुळे शिवसेनेतून निघालो. वैयक्तिक स्वार्थ, मुलाच्या आणि पत्नीच्या पलीकडे त्यांना काही दिसलं नाही, असेही नारायण राणे म्हणाले.