PM Narendra Modi : भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधताना हिंदू धर्मात एक शक्ती आहे. आमचा लढा या शक्तीविरुद्ध आहे, असं म्हटलं होतं. त्यानंतर कुटुंबापाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्ला करण्यासाठी शक्तीला हत्यार बनवले. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर आता उपमुख्यंमत्री अजित पवार यांनीही शक्तीवरुन पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दैवी शक्ती प्राप्त आहे, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. खडवासला विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीमध्ये बोलताना अजित पवार यांनी हे विधान केलं आहे. भाषणादरम्यान अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचा दैवी शक्ती असा उल्लेख केला. अशी माणसं रोज रोज जन्माला येत नसतात. ती दैवी देणगी असते ती एक दैवी शक्ती असते, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
"आम्ही सातत्याने एकमेकांच्या विरोधात काम केलं. निवडणुका लढवल्या. पण काळानुरुप राजकारण बदलतं. पण शेवटी देशाच्या 140 कोटी जनतेने कोणाच्या मागे उभं राहायचं अशा प्रकारचा प्रश्न येतो. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व करत असताना परदेशात जातात तेव्हा सर्व ठिकाणी त्यांचे स्वागत केलं जातं. गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमेरिकेने त्यांचा व्हिसा नाकारला होता. पण नंतर असा काही करिष्मा दाखवला की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांना अमेरिकेने रेड कार्पेट टाकून त्यांना बोलवलं," असे अजित पवार म्हणाले.
"जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख आहे. अशी माणसं सतत जन्माला येत नसतात. ती एक दैवी शक्ती असते ती दैवी देणगी असते. राज्यामध्ये काम करत असताना आम्ही या सगळ्या गोष्टी बघितल्या तेव्हा दोनदा पंतप्रधान झाल्यानंतर ज्याप्रकारे आपल्याकडे विमानतळ, मेट्रो झाली, अटल सेतू, कोस्टल रोडसारखे प्रकल्प उभे केले. जगाच्या पाठीवर पाचव्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था पोहोचली. पंतप्रधान मोदी अहोरात्र काम करतात. दिवाळीमध्ये पंतप्रधान मोदी सीमेवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत असतात. आराम शब्द पंतप्रधानांच्या डिक्शनरीमध्ये नाही," असेही अजित पवार म्हणाले.