Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारा पाऊस सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर काही भागांमध्ये बरसण्यास पुन्हा सुरुवात होईल. पण, हा पाऊस फारसा दिलासादायक नसेल हेच हवामान विभागाचा अंदाज पाहता स्पष्ट होत आहे. सध्याच्या घडीला मराठवाडा, कोकण आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि अधूमधून पावसाच्या सरींची बरसात होत असली तरीही हा पाऊस पुरेसा नाही हेच आता स्पष्ट होत आहे. हवामान विभागाला मात्र भलतीच चिंता लागून राहिली आहे. कारण, ऑगस्ट महिन्याप्रमाणं सप्टेंबरमध्येही पावसानं फसगत केल्यास राज्यावर दुष्काळाचं संकट ओढावू शकतं याचीच भीती सध्या भेडसावत आहे.
हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात दडी मारलेला पाऊस सप्टेंबर महिन्यात सरासरीएवढा बरसणार आहे. सप्टेंबरच्या 4 - 5 तारखेला पाऊस सुरू होईल आणि तो 19 - 20 सप्टेंबरपर्यंत टीकून राहील असं भाकीत हवामान विभागानं वर्तवलं आहे. या अंदाजानुसार सप्टेंबरमध्ये 91 ते 109 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात सप्टेंबर महिन्यातील पर्जन्यमानाच्या अंदाजनुसार मराठवाड्यात 2 आणि 3 सप्टेंबरला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणीमध्येही यादरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेल्यामुळं सप्टेंबरमध्ये तरी हा वरुणराजा शेतकऱ्यांना दिलासा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. असं न झाल्यास राज्यात दुष्काळ अटळ असल्याचीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. तिथे अहमदनगरमध्ये मागील 40 दिवसांपासून पाऊसच पडलेला नसल्यानं, शेतात उभी असलेली पिकं करपू लागली आहेत. तर कृषी विभागानं शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठीच्या सर्वेक्षणालाही सुरुवात झाली आहे.
देशातील पर्जन्यमानाविषयी सांगावं तर, हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबरमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. ज्यामुळं देशातील दक्षिण आणि मध्य भागात असणाऱ्या राज्यांवर याचे परिणाम दिसून येतील. पण, जुलै महिन्याच्या तुलनेत मात्र हा पाऊस कमीच असणार आहे. तिथं मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मेघालय या भागांमध्येहगी चांगला पाऊस होईल.