Maharashtra Rain : जुलैमागोमाग महाराष्ट्रात ऑगस्ट महिनाही बहुतांशी कोरडाच गेला. राज्याच्या काही भागांमध्ये तुरळक स्वरुपातील पाऊस वगळता अनेक भागांमध्ये उन्हाच्या झळा अनेकांनीच सोसल्याय पिकंही करपली. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. शतकातील सर्वात कोरडा ऑगस्ट महिना संकटं वाढवताना दिसतानाच आता राज्यावर पावसाची कृपा पुन्हा होण्याची चिन्हं आहेत. अर्थात हा मोठा दिलासा नाही. कारण, हा दिलासा क्षणिक असू शकतो.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यातील कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या क़डकडाटासह पावसाची हजेरी असेल. तर काही भागांमध्ये सोसाट्याचा वाराही सुटणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बुधवारपासून सुरु झालेला पाऊस शनिवारपर्यंत कायम राहणार असून, कोकण विभागासह थेट गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत या पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये काही ठिकाणी पावसाची हजेरी असेल, तर काही ठिकाणी मात्र पावसाच्या हलक्या सरी बरसतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणाव्यतिरिक्त सातारा, पुणे, सांगली आणि लातूर भागातही पावसाची चांगली हजेरी पाहायला मिळू शरते. विदर्भात हवामान कोरडं राहिलं तरीही पावसाच्या सरींमुळं वातावरणात गारवा पसरणार आहे.
देशाच्या उत्तरेकडी आणि अती दक्षिणेकडील राज्य वगळता देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये पावसानं बगल दिली. महाराष्ट्रात तर परिस्थिती भीषणतेच्याच वळणावर गेली. आयएमडी अर्थात भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी अल निनोचा प्रभाव जास्त दिसून आला. 1901 नंतरचा म्हणजे गेल्या 122 वर्षांमधील सर्वात कोरडा ऑगस्ट महिना अशी या महिन्याची नोंदही करण्यात आली. त्यामुळं सरासरीपेक्षा 13 टक्के कमी पर्जन्यमानानं सर्वांच्याच चिंतेत भर टाकली. येत्या काळातही पाऊस कमी पडल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
किंबहुना त्याची सुरुवातही झाली आहे. पावसानं पाठ फिरवल्यामुळे सोलापूरवर भीषण पाणीसंकट निर्माण झालं आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणं आणि बंधारे कोरडे पडले आहेत. प्रमुख धरणांमध्ये केवळ पिण्याच्या पाण्याचा राखीव साठा शिल्लक राहिला आहे. मान्सूनचा केवळ एकच महिना शिल्लक राहिल्यामुळं आता पाऊस माघारी फिरला तर जिल्ह्यावर दुष्काळाचं गंभीर संकट ओढावणार आहे.