'हे आपलं शेवटचं आंदोलन'; मनोज जरांगेंचे कार्यकर्त्यांना साखळी उपोषण थांबवण्याचे आवाहन

Maharashtra Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी  24 डिसेंबरला सरकारला दिलेली मुदत संपली आहे. मात्र, सरकारकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.  

आकाश नेटके | Updated: Dec 25, 2023, 12:21 PM IST
'हे आपलं शेवटचं आंदोलन'; मनोज जरांगेंचे कार्यकर्त्यांना साखळी उपोषण थांबवण्याचे आवाहन title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने दिलेली 24 डिसेंबरची डेडलाईन रविवारी संपली आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबत सरकारला कोणतीही ठोस घोषणा करता आलेली नाही. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनकांना या साखळी उपोषण थांबवून तयारीला लागण्याचे आवाहन केलं आहे.

"राज्यात मराठा आंदोलनासाठी साखळी उपोषण सुरुय. मात्र 20 जानेवारीला जायची तयारी करायची आहे. त्यामुळं अंतरवली साखळी उपोषण सोडता सगळ्यांनी उपोषण स्थगित करावे ही विनंती आहे. ज्यांना सुरू ठेवायची आहे त्यांनी सुरू ठेवावे मात्र आमचा आग्रह आहे सध्या सगळे उपोषण स्थगित ठेवावे. लवकरच आपला महाराष्ट्र दौरा तयारीसाठी म्हणून सुरू करतोय. सगळ्यांनी तयारीला लागा," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आता हे आंदोलन खूप मोठं आहे. आता आपण घरी नाही राहायचं, आरक्षणासाठी बाहेर पडायचे. मुंबईला आपल्याला धडक द्यायची आहे. त्यासाठी ताकतीने तयारी करा. मिळेल ती वाहने घ्या, आपल्या वस्तू सोबत घ्या, काय काय सोबत घ्यायचं ते सांगूच. मात्र तुम्हाला किती दिवसांसाठी काय घ्यायचं हे तुम्ही ठरवा.थंडी असेल काळजी घ्यायला हवी. ट्रक, ट्रॅक्टर जे असेल ते घेऊ. पण गाडीत झोपायची तयारी ठेवा, कुठल्याच मराठ्यांनी आता घरी राहू नये. हे आपलं शेवटचं आंदोलन आहे, अंतरवली ते मुंबई आपण पायी जाणार आहोत. आपल्यात मुंगीला घुसता यायला नको अशी तयारी करु, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आम्हाला मुंबईला यायची हौस नाही. पण सरकार हुलकावणी देत आहे. म्हणून आम्ही मुंबईत येतोय. सरकार काय हालचाली करतील ते आम्हाला माहिती नाही. मुंबईकडे कूच करण्याशिवाय आता पर्याय नाही. आम्हाला मुख्यमंत्र्यांसह सगळ्यांनी आश्वासन दिलेलं. मात्र तसं झालं नाही. राहीला प्रश्न क्यूरेटिव्ह पिटिशनचा. आम्ही ते नाकारत नाही मात्र ते टिकणार आहे का हा आमचा सवाल आहे. सरकारने ही पिटीशन सुद्धा आमच्यामुळे केली आहे. त्यामुळे हे श्रेय मराठ्यांचे आहे. हे सगळं श्रेय मला आणि कुणाला नको, हे श्रेय गोर गरिबांचे आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

"मराठा कुणबी एक आहे हे सिद्ध झालाय म्हणून आम्हाला आरक्षण द्या हेच आमच म्हणणं आहे. ज्याची नोंद सापडली त्याच्या परिवाराला आरक्षण द्यावं. संबंधित नातेवाईकांना आरक्षण द्यावं, रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण द्यावं, हीच आमची मागणी आहे, एक शब्द राहिला आहे, तो लवकरच सांगू. तसेच 54 लाख नोंदीतून 2 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. जालन्यात एका नोंदीमुळे 70 लोकांना न्याय मिळाला आहे. त्यामुळं नोंदीतून मोठं यश मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की, मागासवर्गीय आयोगाचे काम सुरुय ते आणखी गतीने सुरू करावे," असे जरांगे पाटील म्हणाले.

"शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यात काम करणार आहे, त्यांना युद्ध पातळीवर काम करायला सांगा. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नोंदी सापडतील,फक्त पिंजून काढायची गरज आहे. हे प्रमाणपत्र फुकट मिळणार आहे, कुणी पैसे मागत असतील तर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, बडतर्फ करावे, मराठ्यांनी यावर बारीक लक्ष ठेवावे. तसेच मंत्र्यांनी, आमदारांनी मराठ्यांच्या पाठीशी उभे राहावे," असे आवाहनही मनोज जरांगेंनी केलं आहे.