Maharashtra State Board 12th Exam HSC 2025 Update: उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती देताना अर्ज करण्यासाठीच्या तारखा कोणत्या आहेत यासंदर्भात तपशील देताना, 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर म्हणजेच 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह 12 वीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.
बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन भरायचे आहेत, असं शिक्षण मंडळाने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि काही विषय घेऊन परीक्षा देणारऱ्या विद्यार्थींना कनिष्ठ महाविद्यालयातून अर्ज भरावे लागतील. तसेच आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्जही कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भरायचे आहेत.
आधीच्या वेळापत्रकानुसार 12 च्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रीलिस्ट 27 नोव्हेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करायच्या आहेत, असे मंडळाच्या माध्यमातून जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दिनांक 10 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. त्यासाठी परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र हॉल तिकिटे डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेच्या तारखेपर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्यातील शाळा, महाविद्यालयांत 1029 परीक्षा केंद्र असणार आहेत. यामध्ये पेपर-1 साठी 1 लाख 52 हजार 597 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण 431 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. पेपर-2 साठी 2 लाख 1 हजार 340 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.