Maharashtra Weather News : पावसाची क्षणिक उघडीप; कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वाढली महाराष्ट्राची चिंता

Maharashtra Weather News : पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतानाच, हवामानाचे तालरंग पुन्हा बदलले. ज्यामुळं आता नव्यानं हवामानविषयक इशारा जारी करण्यात आला आहे.   

सायली पाटील | Updated: Oct 10, 2024, 08:33 AM IST
Maharashtra Weather News : पावसाची क्षणिक उघडीप; कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वाढली महाराष्ट्राची चिंता  title=
Maharashtra Weather News low pressuere area in arabian sea latest update Mumbai Konkan rain

Maharashtra Weather News : ऑक्टोबर हीटमुळं उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला असतानाच एकाएकी राज्यावर पुन्हा मुसळधार पावसाटचं सावट पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं नव्यानं जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 24 तासांमध्ये पावसानं क्षणिक उघडीप दिली असली तरीही अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पुन्हा एकदा राज्यावर काळ्या ढगांचं सावट पाहायला मिळेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे. 

पुढील तीन दिवसांत मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचं एक तीव्र क्षेत्र तयार होण्याचा अंदाज असल्यामुळं पुढील तीन दिवस संपूर्ण कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय राज्याच्या किनारपट्टीवर पावसाचा जोर जास्त रहाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार लक्षद्वीप नजीकच्या समुद्रात मंगळवारपासून कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, त्याची वाटचाल वायव्य दिशेने होताना दिसत आहे. येत्या काळात हे वारे आणखी तीव्र होणार असून, अरबी समुद्रात त्यामुळं कमी दाबाचं क्षेत्र अधिक प्रभावी राहणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Ratan Tata death LIVE updates: रतन टाटा यांच्या निधनानं देशभरातून हळहळ; महाराष्ट्रात शासकीय दुखवटा 

मुंबईपासून केरळपर्यंतच्या किनारपट्टीवर या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं सर्वाधिक प्रभावित क्षेत्र इथं राहणार आहे. ज्यामुळं पावसानं अद्यापही पाठ सोडलीच नाहीय असं म्हणणं गैर ठरणार नाही. सकाळ- दुपारी उन्हाचा तडाखा आणि सूर्य मावळतीला जाताना सुटणारा सोसाट्याचा वारा, त्यासह येणारा वादळी पाऊस या विचित्र हवामानामुळं नागरिकांना कैक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.