Maharashtra Weather News : हवामान विभागाकडून मिळालेल्या इशाऱ्यानुसारच राज्यात सद्यस्थिती पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी भागामध्ये असणाऱ्या अनेक भागांमध्ये हवेतील आर्द्रतेमुळं तापमान सातत्यानं वाढत चाललं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांतही अशीच परिस्थिती कायम राहणार असून, राज्यातील तापमान 2 ते 4 अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, अवकाळीचं सावट मात्र काही अंशी निवळल्याचंही चित्र आहे.
गुरुवारी सोलापुरात राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. इथं तापमानाचा आकडा 39 अंशांवर पोहोचला होता. यामध्ये येत्या 48 तासांत 2 ते 4 अंशांची वाढ अपेक्षित असल्यामुळं राज्यात उन्हाचा दाह अडचणी निर्माण करण्याचं चित्र आहे. दरम्यान, विदर्भाच्या पश्चिमेला सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, त्यातच केरळपासून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तिथं झारखंडपासून मेघालयपर्यंतसुद्धा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं या सर्व परिस्थितीचे थेट परिणाम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील ढगाळ वातावरणावर दिसून येत आहेत.
IMD नं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशाच्या काही भागांमध्ये 26 मार्चपर्यंत ढगांच्या गडगडाटासह वीजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी असेल. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टीस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या अतीव उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसासह हिमवृष्टीचा इशारा भारतील हवामानशास्त्र विभागानं दिला आहे.
रायलसीमा, केरळ, माहे, सौराष्ट्र आणि कच्छ येथे पुढील चार दिवस तर, तामिळनाडू, पुदूच्चेरी आणि करईकल येथे पुढील दोन दिवस दमट वातावरण त्रास वाढवणार आहे. देशाच्या पूर्वोत्तर भागात येणाऱ्या अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघलय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, उप हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीम येथे 21 ते 26 मार्चदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर आणि उत्तर पूर्वेला सुरु असणाऱ्या हवामानाच्या या स्थितीमुळं आता महाराष्ट्रातही सातत्यानं तापमानात बदल अपेक्षित आहेत.