Maharashtra Weather News : जानेवारी महिना सुरू झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं या महिन्याचा उत्तरार्ध सुरूही झाला आहे. याच दिवसांमध्ये सबंध देशासह राज्यातील हवामानातही लक्षणीय बदल होताना दिसत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रावर ढगाळ वातावरणाचं वर्चस्व असून, त्यामुळं किमान तापमानाचा आकडा वाढताना दिसत आहे. परिणामी राज्यात थंडीचा कडाका कमी होत असल्याची बाब स्पष्ट होत आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली असून, याच कारणास्तव थंडी कमी होत असून, कमाल तापमानातही 2 ते 3 अंशांची वाढ अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये धुरक्याची चादर असल्यामुळं दृश्यमानतेवर याचे परिणाम होत आहेत. तर, पश्चिम महाराष्ट्रातही दाट धुक्याची चादर सूर्य डोक्यावर आलेला असतानाही कायम असल्यामुळं काही अडचणी उभ्या ठाकत आहेत.
राज्यातून थंडी टप्प्याटप्प्यानं काढता पाय घेण्यास सुरुवात करताना दिसत आहे ही बाब आता स्पष्ट असून, आता परतीच्या प्रवासावर निघालेली हीच थंडी काही भागांमध्ये मात्र तडाखा देणार हे नाकारता येत नाही. पुढील 24 तासांमध्ये राज्यात संमिश्र वातावरण पाहण्यास मिळणार असून, सायंकाळच्या वेळी वाऱ्याचे वेगवान झोत हजेरी लावून घाट क्षेत्रामध्ये गारठा आणखी वाढवतील. तर, किनारपट्टी भागांमध्येही अंशत: गारठा जाणवेल. दुपारच्या वेळी मात्र उष्मा अडचणीत आणखी भर टाकताना दिसेल.
केरळलगतच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये अरबी समुद्राच्या आग्नेयेला चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत आहे. तर, तिथे उत्तरेकडील राज्यांमध्ये मैदानी क्षेत्रांवरही वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळं या भागांमध्ये थंडीचा कडाका कमी- जास्त होत असल्याची बाब लक्षात येत आहे.
हिमाचल प्रदेशातील बहुतांश भागांमध्ये थंडीची लाट आली असून, पर्वतीय क्षेत्रांवर हिमवादळ आल्यानं मैदानी भागांमध्येही पारा घसरला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मनाली, सोलंग, अटल बोगदा या क्षेत्रांमध्ये बर्फाचं साम्राज्य पाहायला मिळालं. शुक्रवारी या स्थितीमध्ये फारशी सुधारणा होणार नसून, उलटपक्षी इथं हिमवृष्टीचा यलो अलर्ट जारी करत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.