Congress State President: काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळत नसल्याची माहिती आहे. काँग्रेसनं राज्यातील अनेक नेत्यांना प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव दिलाय. मात्र हा काटेरी मुकूट स्वीकारण्यास कुणीच धजावत नसल्याचं समोर आलंय. पक्षाच्या अडचणीच्या काळात हे शिवधनुष्य कोण पेलणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
विधानसभेनंतर निर्माण झालेला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच अद्यापही कायम आहे. निकालानंतर आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी काँग्रेस तरुण चेह-याच्या शोधात आहे. मात्र काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्तावच धुडकावून लावलाय. प्रदेशाध्यक्षपदी तरुण किंवा अनुभवी व्यक्तीला संधी मिळावी अशी हायकमांडची इच्छा आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांसमोर प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र कुणीही प्रदेशाध्यक्षपदाचा काटेरी मुकूट स्वीकारण्यास तयार नसल्याची माहिती आहे. यामध्ये,
पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी चाचपणी करण्यात आलीय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपण रेसमध्ये नसल्याचं जाहीर करून टाकलं.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सूचक वक्तव्य केलंय. महिलांना संधी मिळालं तर चांगलंच आहे, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी सुप्त इच्छा बोलून दाखवलीय.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं अक्षरश पानिपत झालंय. त्यानंतर पक्षसंघटनेला नव्यानं उभारी देण्याचं मोठं आव्हान काँग्रेससमोर आहे. लवकरच महाराष्ट्र काँग्रेसला अध्यक्ष मिळेल, असं सांगत प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सस्पेन्स वाढवलाय.
काँग्रेसनं सतेज पाटलांसमोर प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव ठेवलाय. आपण या पदासाठी असमर्थ असल्याचं सतेज पाटलांनी कळवलंय. मात्र वरिष्ठांची सतेज पाटलांच्या नावाला पसंती असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात कॅप्टन कधी मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात.