Maharashtra Rain Updates : जून महिन्याच्या अखेरीस जोर धरलेला मान्सून (Monsoon) आता राज्यात, स्थिरावताना दिसत आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार जुलै महिन्यात मान्सून नाराज करणार नसून, तो सरासरीइतकी हजेरी लावणार आहे. असं असलं तरीही राजच्यातील सध्याचं पर्जन्यमान हे कमीच असून, धरण क्षेत्रांमध्ये आणखी चांगला पाऊस होण्याची गरज हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
सध्या अलिबाग (Alibag), ठाणे (thane), पालघर या भागांमध्ये पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. तळकोकणाही परिस्थिती वेगळी नाही. पावसानं जोर धरल्यामुळं बहुतांश भागांमध्ये शेतीच्या कामांना वेग आला असून, भात लावणीची कामं अनेकांनीत हाती घेतली आहेत. पुढील काही दिवसांच्या हवामानाविषयी सांगावं तर, 13- 14 जुलै रोजी राज्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक असेल. तर, काही भागांमध्ये तो अतीमुसळधार कोसळेल.
पुणे वेधशाळेचे महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, 'महाराष्ट्रात पुढील 4, 5 दिवस पाऊस संमिश्र राहील, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तरस मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे'. पावसाच्या या स्थितीमध्ये 13 जुलैनंतर सुधारणा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
July Rainfall ?
IMD ने जुलैसाठी वर्तवलेला हंगामी अंदाज महाराष्ट्राच्या काही भागांसह मध्य भारतात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता दर्शवतो विस्तारित श्रेणीचा अंदाज देखील हेच सूचित करतो
पुढील 5 दिवसांचा अंदाज चांगला दिसत आहे इतर मॉडेल देखील समान ट्रेंड दर्शवितात pic.twitter.com/hbsF4jd7cw— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 10, 2023
पावसाच्या धर्तीवर सध्या कोकण आणि विदर्भ पट्ट्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईत पावसाळी सरींची ये-जा सुरु राहणार असून, ढगांची उघडीप पाहायला मिळेल. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये समुद्र खवळलेला असेल. किनारपट्टी भागात सोसाट्याचा वाराही वाहील. त्यामुळं पावसाचा आनंद घेण्यासाठी समुद्रकिनारी जाणार असाल तर, काळजी घ्या.
राज्यात पावसानं जोर धरलेला असतानाच आता अनेकांचे पाय पावसाळी पर्यटनस्थळांकडे वळताना दिसत आहेत. परिणामी आंबोली, लोणावळा, माळशेज, इगतपुरी या आणि अशा भागांसोबतच गडकिल्ले सर करणाऱ्यांचाही आकडा मोठा असल्याचं लक्षात येत आहे. या साऱ्या परिस्थितीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणाही कामाला लागली आहे. हुल्लडबाजांवर पोलिसांची करडी नजर असणार असून, त्यांच्यावर कारवाईही केली जाणार आहे. त्यामुळं पावसाचा आनंद घ्या, पण भान हरपून देऊ नका!