Weather Update : राज्याच्या 'या' भागांना पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा; वादळी वारेही घोंगावणार

Maharashtra Weather : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून थंडीची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. पण, ही थंडी फार काळ न टीकता राज्यावर सध्या अवकाळीचच सावट पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Nov 22, 2023, 08:48 AM IST
Weather Update : राज्याच्या 'या' भागांना पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा; वादळी वारेही घोंगावणार  title=
Maharashtra Weather rain predictions latest update

Maharashtra Weather : हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला तामिळनाडूच्या किनारपट्टी भागावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी महाराष्ट्रापर्यंत या वाऱ्यांचे परिणाम दिसणार असून, पुढील दोन दिवस म्हणजेच पुढच्या 48 तासांसाठी कोकण, मध्य महाराष्ट्रासह गोव्यातही पावसाच्या सरी बरसणार आहेत. शुक्रवारी वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा सुटेल. मात्र पावसाचं प्रमाण फारसं नसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

श्रीलंकेपासून बांग्लाच्या उपसागरापर्यंत वाऱ्यांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तर, भारताच्या दक्षिणेला असणाऱ्या कोमोरीन पट्ट्यापासून आंध्र प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टाही तयार धाला आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावतण तयार होत असून, त्यामुळं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांसह सातारा आणि सोलापूरातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharastra Politics : शिंदे गटाच्या 13 खासदारांचं भवितव्य धोक्यात? भाजपच्या अहवालाने शिंदे गटाला टेन्शन

 

23 नोव्हेंबरला रोजी गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज असून शुक्रवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील. बुधवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रात वातावरण कोरडं राहण्याची शक्यता असून,  दोन दिवस किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे

राज्यातील एकंदर हवामानाची स्थिती पाहता थंडीचं प्रमाण मोठ्या फरकानं कमी होताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे इथं अपवाद ठरत आहेत ही बाब मात्र नाकारता येत नाही. देशाच्या उत्तर पश्चिमेकडेसुद्धा हिवाळ्याचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. पश्चिमी झंझावात सक्री असून, त्यात अल निनोच्या प्रभावाची भर पडल्यामुळं आता थंडी थेट डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारीच्या सुरुवासीस जोर धरताना दिसणार आहे. 

सध्याच्या घडीला देशाच्या उत्तरेकडे दिल्ली आणि नजीकच्या भागामध्ये तापमानाच घट होताना दिसत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मीरच्या खोऱ्यामध्ये पर्वतीय क्षेत्रांमध्ये बोचरी थंडी हल्लीच जोर धरताना दिसू लागली आहे. तर, याच राज्यांमधील मैदानी क्षेत्रांमध्ये मात्र पावसाची रिमझिम पाहायला मिळणार असल्यामुळं हवेतील गारवा आणखी वाढणार आहे. हिवाळी सहलीच्या निमित्तानं तुम्ही यापैकी कोणत्याही राज्याला भेट देण्यासाठी जाऊ इच्छिता, तर आधी हवामानाचा अंदाज पाहूनच घ्या.