Weather Update : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, किमान तापमानात घट नोंदवली जात आहे. तिथं पडलेल्या या कडाक्याच्या थंडीचे थेट परिणाम आता महाराष्ट्रावरही दिसू लागले आहेत. जिथं काही दिवसांपूर्वी राज्यावर अवकाळीचं सावट होतं तिथंच आता वातावरण बहुतांशी कोरडं झालं असून, उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळं राज्यातही किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढण्याचं सर्वाधिक प्रमाण उत्तर महाराष्ट्रामध्ये दिसत असून, उर्वरित राज्यामध्ये तापमानाच काहीसे चढ- उतार नोंदवले जात असले तरीही ही थंडीच त्यात बाजी मारताना दिसत आहे. परिणामी पुढील दोन ते तीन दिवस गारठा कायम राहणार असून, मध्य आणि उत्तर महाराष्ट्र आणखी गारठणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
निफाड आणि धुळ्यामध्ये थंडीचा कडाका सर्वाधिक जाणवणार असून, उर्वरित राज्यातही किमान तापमान 10 ते 18 अंशांच्या घरात राहणार आहे. मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि कोकण पट्ट्यामध्येही पहाटेच्या वेळी धुकं आणि थंडीचा कडाका जाणवणार असल्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
उत्तर भारताच्या हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मीर खोऱ्याला वगळता उर्वरित राज्यांमध्ये किमान तापमानात वाढ होत आहे. असं असलं तरीही हरियाणा, पंजाब, चंदीगढ, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मात्र धुक्याची चादर अच्छादलेली असेल. ज्यामुळं रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर याचे थेट परिणाम होताना दिसतील.
Skymet या खासगी वृत्तसंस्थेनुसार पुढील 24 तासांमध्ये झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेटांवरही पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात मात्र हाडं गोठवणारी थंडी अडचणी निर्माण करताना दिसेल. पुढील 24 तासांमध्ये राजस्थानचा पश्चिम भाग, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागामध्ये वर्षातील सर्वात थंड दिवस नोंदवला जाऊ शकतो.