Maharastra Politics : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या कौटुंबिक वादावरून चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळतंय. विद्या चव्हाण यांनी त्यांची सून गौरी चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यामधील संवादाची ऑडियो क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवली. चित्रा वाघ माझ्या सुनेला माझ्याविरोधात भडकवत असल्याचा आरोप चव्हाणांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून हे सर्व घडतंय, असा दावा विद्या चव्हाणांनी केला आहे. 6 महिन्यांपूर्वी मला ही ऑडिओ क्लिप मिळाली. माझ्या कुटुंबाचा राजकारणाशी संबंध नसताना राजकारणासाठी वापर केला जातोय, असा आरोप विद्या चव्हाण यांनी केलाय.
कुटुंबातील वाद चित्रा वाघ यांनी भडकवला, असा थेट आरोप करण्यात आल्याने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. माझ्या घरगुती भांडणात यांनी मध्यस्थी करुन चित्रा वाघ त्याला वेगळं वळण देण्याच काम दिलं आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून या प्रकरणाला बँकिंग दिलं होतं, असा आरोपही चव्हाणांनी केला.
तर विद्या चव्हाण यांनी सूनेवर अतोनात अत्याचार केले. एक महिला म्हणून गौरी चव्हाणला मदत केल्याचं सांगत चित्रा वाघ यांनी प्रतिहल्ला चढवलाय. चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्या वादाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली ती अनिल देशमुखांनी पत्रकार परिषदेत दाखवलेल्या पेनड्राईव्ह नंतर..
अनिल देशमुखांनी पत्रकार परिषदेत पेन ड्राईव्ह दाखवत फडणवीसांवर आरोप केले होते. तर पेन ड्राईव्ह तयार आहे, 3 तासांत देशमुखांचा पर्दाफाश करण्याचा इशारा चित्रा वाघ यांनी दिला होता. तर चित्रा वाघ यांचेच कारनामे उघड करण्याचा इशारा देत विद्या चव्हाण यांनी ऑडिओ क्लीप पत्रकार परिषदेत ऐकवली. या क्लिपमध्ये चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्या सुनेचं संभाषण आहे. वाघ यांनी आपल्या सुनेला भडकवल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय.
दरम्यान, विधानसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपलेत.. त्याआधीच राज्याच्या राजकारणात सुरू झालेलं हे पेन ड्राईव्ह पॉलिटीक्स आता वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर आल्याचं पाहायला मिळतंय.. त्यामुळे नेत्यांनी कुठेतरी संयम पाळण्याची गरज निर्माण झालीय.