Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद रंगला असतानाच आज जरांगे पाटील जालन्यात जाहिर सभा घेत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील पांजरपोळ मैदानावर ही सभा होणार आहे.जरांगे पाटील जालना शहरात पोहचल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज उद्यान ते सभा स्थळापर्यत 2 हजार मोटार सायकलींची शांतता रॅली काढण्यात येणार आहे.या रॅलीत जरांगे पाटील देखील सहभागी असणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला लाखो मराठा समाज बांधव येण्याचा दावा आयोजकांकडून केला जात आहे. या सभेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असतानाच सभेच्या जय्यत तयारीचीही चर्चा आहे. तब्बल 90 एकर परिसरात जरांगे पाटलांची सभा होत आहे. तर, तब्बल 140 जेसेबींद्वारे जरांगे पाटलांवर फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. या सभेतून जरांगे पाटील शक्तीप्रदर्शन करणार असल्याची चर्चा आहे.
छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून ते सभा स्थळापर्यंत जरांगे पाटलांची रॅली निघणार आहे. या रॅली दरम्यान ठिकठिकाणी तब्बल 140 जेसीबींद्वारे जरांगे पाटलांवर फुलांचा वर्षाव केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजेच्या सुमारास या सभेला सुरुवात होणार असून लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव या सभेला येणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
दरम्यान, सरकार आमचेच लोक आमच्याच अंगावर घालतंय असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारवर केला आहे. नारायण राणे यांनी काल मनोज जरांगे कोण आहे मी ओळखत नाही, अशी टिका केली होती. यावर उत्तर देताना जरांगे पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 'जालन्यातील सभा ही मराठा समाजला शांत करण्यासाठी असून आता कुणीही मध्ये आला तरी मराठा आरक्षण घेणारच, असा विश्वास देखील जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे.