'मुंबईत येणाऱ्या मराठ्यांना अडवलं तर फडणवीसांच्या घरी...'; जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Mumbai Protest: मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण आंदोलन होणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 29, 2023, 04:19 PM IST
'मुंबईत येणाऱ्या मराठ्यांना अडवलं तर फडणवीसांच्या घरी...'; जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा title=
जरांगे-पाटलांचा सरकारला थेट इशारा

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Mumbai Protest: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मैदानाची पहाणी करण्यासाठी मराठा समाजातील काही पदाधिकारी आज मुंबईतील आझाद मैदानाची पहाणी करुन गेले. असं असतानाच दुसरीकडे मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधताना थेट राज्यातील सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत राज्य सरकारला आंदोलकांच्या मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या न रोखण्याचं आवाहन केलं आहे.

आडवण्याचा प्रयत्न करु नये...

दिशा मुंबईची, ध्येय मराठा आरक्षणाचं अशा शब्दांमध्ये मनोज जरांगे-पाटलांनी काहीही झालं तरी आपण मुंबईतील उपोषणासाठी जाणार असं म्हटलं आहे. आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे-पाटील यांचा मोर्चा निघणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे-पाटलांनी सरकारला इशारा दिला आहे. मराठ्यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी दिली नाही तरी लोकशाही मार्गाने आंदोलन करु. जागा मिळेल तिथे आंदोलन करु. सरकारने आम्हाला आडवण्याचा प्रयत्न करु नये, असं जरांगे-पाटील थेट फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले आहेत.

सगळ्या मराठ्यांना विनंती आहे की...

"माझा उद्देश एकच आहे की आमरण उपोषण करणे आणि त्या माध्यमातून गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून देणे. मरेपर्यंत मागे फिरणार नाही. माझं ध्येय आणि उद्देश ठरलेलं आहे त्यापासून आपण दूर जाणार नाही," असं जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना म्हटलं. तसेच जरांगे-पाटलांनी मराठा समाजालाही विनंती करत मुंबईतील मोर्चात सहभागी होण्यास सांगितलं. "सगळ्या मराठ्यांना विनंती आहे की एकत्र या. असतील नसतील तिथून मुंबईत या. पुरे झालं आता गोरगरीबांच्या पोरांचं कल्याण होईल," असं जरांगे-पाटील म्हणाले.

...तर फडणवीससाहेबांच्या घरी जाऊन...

आंतरवाली सराटी ते मुंबई दरम्यानचा प्रवास आणि मोर्चा हा फारच शांततेमध्ये जाणार असल्याचं मनोज जरांगे-पाटील यांनी आवर्जून सांगितलं. "आम्ही मुंबईला शांततेत जाणार आहे. (आंदोलक) खाण्यापिण्याचं धान्य घेऊन जाणार आहेत. त्यांच्याविरुद्ध सरकारला काही कारवाई करता येणार नाही कारण ते ट्रॉल्यांमध्ये दगड घेऊन जाणार नाहीत म्हणून त्यांना थांबवू नये. मराठा समाजालाही विनंती आहे की आपण काही दगड घेऊन जाणार नाही. ट्रॉल्या घ्या. त्यामध्ये आपल्याला ऊन लागलं, पाऊस लागला असं काही झालं तर बसता येईल, उठता येईल अशी सोय होणारं सामान घ्या. सरकार काही अडवणार नाही. जप्ती केली तर फडणवीससाहेबांच्या घरी जाऊन बसू सगळेजण," असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले आहेत.