Maratha Reservation : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र (kunbi certificate) देऊन त्यांना ओबीसी (OBC) प्रवर्गाअंतर्गत आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून लावून धरली आहे. मनोज जरांगे यांनी या मागणीसाठी दोनवेळा आमरण उपोषण देखील केलं आहे. मात्र सरकारने त्यांच्याकडे वेळ मागितला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीमुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला आहे. यावर आता मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
कुणबी प्रमाणपत्रासह मराठ्यांचा ओबीसीत समावेश झाल्यावर त्यांना आरक्षणाचा केवळ तीन ते साडेतीन टक्केच लाभ मिळणार आहे. त्याऐवजी मराठ्यांनी आर्थिक दुर्बल घटकांसाठीचं 10 टक्के आरक्षण घ्यावं, असा सल्ला ओबीसी नेत्यांनी जरांगे यांना दिला आहे. त्यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पिकत नाही ते वावर आम्हाला आणि स्वतःला चांगले ठेवता, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
"कायदा सांगतो की, मराठ्यांना मिळणारं आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार आहे. म्हणजेच मराठ्यांना 50 टक्के आरक्षण मिळेल. आता तुम्ही ईडब्ल्यूएसचा मुद्दा काढू नका. हवं तर ते आरक्षण तुम्ही घ्या आणि आम्हाला हे ओबीसी आरक्षण द्या. तुम्ही ते 10 टक्के आरक्षण घ्या आणि ओबीसी आरक्षण आम्हाला द्या. चांगलं वावर तुम्ही घेताय आणि डोंगराचं वावर आम्हाला देताय का? चांगलं काळं रान तुम्ही घेताय आणि ज्या वावरात औत चालत नाही ते आम्हाला देताय. आम्हाला वेडे समजता का? त्यापेक्षा वाटण्या करा आणि तुम्ही ईडब्ल्यूएस आरक्षण घ्या आणि आम्हाला ओबीसी आरक्षण द्या," असा सल्ला मनोज जरांगेंनी दिलाय.
"मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी घरी जाणार नाही, तसेच दिवाळीदेखील साजरी करणार नाही. मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी गेल्या काही दिवसांमध्ये आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना मी दिवाळी साजरी करू शकत नाही. मी दोन दिवस आंतरवाली सराटी या माझ्या गावी जाणार. ज्या-ज्या मराठा तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबियांना भेटणार. त्यानंतर महाराष्ट्राचा आशीर्वाद घेण्यासाठी बाहेर पडणार. मराठ्यांची एकजूट करण्यासाठी 15 ते 23 नोव्हेंबरपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पुन्हा मराठवाडा आणि मुंबई असा दौरा करणार आहोत. आंदोलकांच्या गाठीभेटी घेणं सुरू करणार. या काळात साखळी आंदोलन सुरूच राहील," असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय.