नागपूर : महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च आणि एप्रिल महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. सोबतच महावितरणच्या सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वतः रिडींग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रिडींगचे वीजबिल प्राप्त होईल.
राऊत यांच्या सूचनेप्रमाणे महावितरणने मार्च महिन्याचे बिल भरण्यास दि. १५ मे २०२० तर एप्रिल-२०२० चे वीजबिल भरण्यासाठी दि. ३१ मे २०२० ची अंतिम तारीख दिली आहे. यामुळे लॉकडाऊन काळात अडचणीत असलेल्या राज्यातील महावितरणच्या वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे महावितरणकडून २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणे बंद करण्यात आले आहे. सोबतच वीजबिलांची छपाई व वितरण देखील बंद करण्यात आले आहे. तसेच वीजबिल भरणा केंद्र देखील बंद आहेत.
कसं अपलोड करता येणार मीटरचं रिडींग?
महावितरणच्या कन्झुमर पोर्टलवरून किंवा मोबाईल एपमधील लॉगीनद्वारे वीजग्राहकांना मीटरचे रीडिंग अपलोड करण्याची सोय आहे. महावितरणच्या ग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन (सेल्फ मीटर रीडिंग) पाठवावे असा ‘एसएमएस’ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या राज्यातील २ कोटी १० लाखांपेक्षा अधिक वीजग्राहकांना पाठविण्यात येत आहे.
वीजग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन पाठविल्यास त्यांना प्रत्यक्ष वापरानुसार वीजबिल देणे शक्य होणार आहे. तसेच जे ग्राहक स्वत:चे मीटर रीडिंग पाठविणार नाही, त्यांना सरासरी वीजबिल पाठविण्यात येईल. पुढील कालावधीत महावितरणकडून प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेतल्यानंतर या ग्राहकांना अचूक वीजबिल आकारण्यात येईल व मागील सरासरी वीजबिलांचे समायोजन करण्यात येणार आहे.
'लॉकडाऊन'मुळे मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबिल पाठवलं जाणार आहे. याव्यतिरिक्त वेबसाईट, मोबाईल ऍपवरुनही वीजबिल पाहण्याची आणि भरण्याची सुविधा असेल.