तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : सध्या जमाना मल्टीप्लेक्सचा आहे. पण मल्टीप्लेक्सच्या काळातही साताऱ्यात एक अनोखा आणि हटके प्रयोग सुरू आहे...मोबाईल थिएटरचा...चला तर पाहूयात दोघा तरुणांच्या आयडियाची ही भन्नाट कल्पना. सध्या साताऱ्यात धूम आहे ती याच सिनेमावाल्यांची.
ग्रामीण भागात दूरपर्यंत सिनेमा पोहोचावा, यासाठी सिनेमा एडिटर निलेश लावंड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भन्नाट आयडिया शोधलीय. ती मोबाईल थिएटरची. सिनेमावाले नावाच्या या मोबाईल थिएटरला चांगला प्रतिसाद मिळतोय.
गेल्या महिनाभरापासून साताऱ्यातील वडूज आणि सांगलीतल्या तासगावमध्ये मोबाईल थिएटर सुरू आहे. या थिएटर मध्ये मल्टिप्लेक्स सारख्या सुविधा देण्यात आल्यात.एका मोठ्या बलून सारख्या दिसणाऱ्या या मोबाईल थिएटरमध्ये एसी, फॅनची देखील सुविधा आहे.
पूर्वी ग्रामीण भागात टुरिंग टॉकीज असायचे. त्याच मंडळींना सोबत घेऊन सिनेमावाल्यांनी मोबाईल थिएटर संकल्पना साकारलीय..
सध्या सलमान खानचा दबंग ३ सिनेमा या थिएटरमध्ये दाखवला जातोय. नवा सिनेमा पाहायला मिळत असल्यानं ग्रामीण भागातील लोकही खुश आहेत.
२०२० मध्ये राज्यात अशाप्रकारची आणखी १०० मोबाईल थिएटर सुरू करण्याचा सिनेमावाल्यांचा प्रयत्न आहे. या धडपडीचा क्लायमॅक्स काय होतो, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.