खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधिमंडळ (Maharashtra Legislature) हे तर ‘चोर’मंडळ आहे असं विधान केलं आहे. संजय राऊतांच्या या विधानानंतर भाजपा (BJP) आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. यानंतर संजय राऊतांविरोधात विधानसभेत (Vidhan Sabha) हक्कभंग प्रस्तावही आणण्यात आला आहे. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी संजय राऊतांच्या विधानावर टीका केली असून हा 'महाराष्ट्रद्रोह' असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही हे विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. विरोधकांच्या गदारोळानंतर सभागृह काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं.
"विधिमंडळमध्ये बनावट शिवसेना आहे. हे बनावट चोरांचं मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने , बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. ती पदे आम्ही अशी ओवाळून टाकतो. पदं गेली तर परत येतील, पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे," असं संजय राऊत म्हणाले.
"विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही. लोकांची गर्जना काय आहे हे काल आपण धाराशिवला पाहिलं. ज्या पद्धतीने बच्चू कडू यांना जाब विचारण्यात आला तो जाब म्हणजे शिवगर्जना. ही गर्जना पोहचविण्यासाठी महाराष्ट्रात जात आहोत. कोल्हापुरात आल्यानंतर शिवसेना अधिक मजबूत होत आहे हे दिसून आलं. या दौऱ्याच्या निमित्ताने लोकसभेसंदर्भात चर्चा करू," असं संजय राऊत म्हणाले.
"आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली ज्या एका चोरानं म्हणजे किरीट सोमय्यांनी लाखो करोडो रुपये गोळा केले, त्याची चौकशी सुरू असताना सरकार बदललं आणि चौकशी थांबली. पण मी स्वत: विक्रांतचे पैसे कुठे गेले, विचारणार आहे. मी स्वत: न्यायालयात जाणार आहे. किरीट सोमय्या यांनी कोणतेही आरोप करण्यापेक्षा विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला हे आधी सांगावं आणि मग बोलावं. सरकार बदलताच अनेक चोरांना क्लीन चीट देण्यात आली. पण दुसरीकडे जो जाब विचारतो, त्याला तुरुंगात टाकायचं खोटे गुन्हे दाखल करायचे बदनाम करायचं अस षडयंत्र रचला जात आहे , पण जनता 2024 ला याचा सर्व हिशोब करेल," असा इशारा संजय राऊतांनी दिला.
"करोनासंदर्भात गुन्हा दाखल करायचा असेल तर योगी आदित्यनाथ यांच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल करावा. अनेक प्रेत गंगेतून वाहून गेली, सगळ्यात पहिला 307 चा गुन्हा सरकारने योगी आदित्यनाथ यांच्यावरती टाकायला पाहिजे. इतकंच नव्हे तर करोना काळात गुजरातमध्ये स्मशानभूमीत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी सर्वात प्रथम त्या ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करावा," अशी मागणी संजय राऊतांनी केली. महाराष्ट्रात अनेक परप्रांतीय आहेत, ज्यांना मराठी माणसाविषयी कमालीचा द्वेष आहे. त्यांना महाराष्ट्र लुटून दुसऱ्या राज्यात न्यायचा आहे असा आरोप संजय राऊतांनी केला.
"कसबा निवडणूक आपण हरत आहोत हे जेव्हा भाजपाला कळालं तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला. हाताशी यंत्रणेचा वापर करून तुम्ही राज्य करणार असाल तर हे राज्य कोलमडून पडेल. चिंचवडची जागा जात आहे हे तुम्हाला कळालेली माहिती चुकीची आहे. कारण चिंचवडची जागा आमच्याकडे नव्हती. कसब्याची जागा भाजपकडून जातीय ही खरी बातमी आहे जी 30-35 वर्षे भाजपकडे आहे. चिंचवडची जागा कोण जिंकेल हे भाजपाला सांगता येत नाही हा भाजपचा पराभव," असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
"पालघरमधील साधूंचा मृत्यू आणि कनेरी मठावरील गाईंचा मृत्यू आम्ही समान मानतो. कनेरी मठावरील गायीच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. आमचे आमदार आज विधिमंडळात गाईंना श्रद्धांजली वाहतील," असंही संजय राऊत म्हणाले.