मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबई बंदची हाक मराठा संघटनांनी दिली आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या मराठा संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. यात शाळा आणि महाविद्यालयांचा समावेश आहे. तसंच शाळांच्या बसेसही सुरू ठेवण्यात येणार आहेत. या बंददरम्यान कोणतीही हिंसा न करता शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं आहे.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. तसंच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. यावेळी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यावरून मराठा क्रांती मोर्च्याच्या बैठकीत गोंधळ झाला. एका गटानं बंद ठेवण्याची मागणी केली. मात्र ती धुडकावून लावण्यात आली. बंद शांततेत पाळावा असं आवाहन सकल मराठा मोर्चाने मराठा तरूणांना केलं आहे.
आजच्या मुंबई बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसतो आहे. या बंदमधून शाळा वगळण्यात आल्यायत. त्यामुळे सकाळच्या वेळी तरी मुंबईमधलं जनजीवन सुरळीत सुरू असल्याचं चित्र आहे.