Mumbai Local Train Update: दादर हे रेल्वे स्थानक उपनगरीय रेल्वे स्थानकातील सर्वात व्यस्त स्थानक आहे. पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गावरील गाड्या दादर स्थानकात थांबतात. तसंच, दादर परिसरात अनेक कार्यालय असल्याने रेल्वेतील बहुतांश गर्दी दादर स्थानकात कमी होते. प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल एक्स्प्रेसची सेवा व्यवस्थित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दादर स्थानकाच्या फलाट क्रमांकात बदल केले आहेत. बुधवारपासूनच हा बदल लागू झाला आहे.
दादर स्थानकातून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. मध्य आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही विभागातून नागरिक या स्थानकात उतरतात. तसंच, स्थानकातून दररोज 800 पेक्षा जास्त लोकल आणि मेल एक्स्प्रेस धावतात. बुधवार 27 नोव्हेंबरपासून फलाट क्रमांक 10 ऐवजी फलाट क्रमांक 9 ए आणि फलाट क्रमांक 10 ए ऐवजी फलाट क्रमांक 10 म्हणून ओळखला जाईल. हे बदल बुधवारपासून लागू केले असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
फलाट क्र. 9 ए लोकलसाठीच मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील पूर्वीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि आताच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 9 ए वर पूर्वी मेल-एक्स्प्रेस आणि लोकल थांबत होत्या. परंतु, आता फक्त लोकल गाड्या थांबणार आहेत. नव्याने बदल केल्याप्रमाणे सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर 22 डब्यांची एक्स्प्रेस उभी
करण्यास पुरेशी जागा उपलब्ध असल्याने हा प्लॅटफॉर्म आता फक्त मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी असणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान १० अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.