Mumbai Goa Highway: गेले कित्येक वर्ष मुंबई-गोवा महामार्ग रखडलेला आहे. मात्र लवकरच नवीन चौपदरी मुंबई-गोवा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. सध्या गोव्याला जाण्यासाठी 12 तासांहून अधिक वेळ लागतो. मात्र आता हा वेळ अर्ध्यावर येणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. मे किंवा जून 2025पर्यंत पूर्ण होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्ग एकूण 466 किमीचा आहे. रस्त्याचं काम झाल्यानंतर केवळ 6 तासात मुंबईहून गोवा गाठता येणारे आहे. या मार्गादरम्यान 41 बोगदे आणि 21 पूल उभारले जाणार आहेत. माणगाव, इंदापूर, पाली, लांजा, कोलाड आणि चिपळूण या गावात बायपास आणि पुलांचे बांधकाम सध्या सुरू आहे. महामार्गाला होत असलेल्या विलंबामुळं प्रकल्पाचा खर्च ७,३०० कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) जेएनपीटीजवळील पागोटे (पनवेलकडे जाणारा एमटीएचएलचा लँडिंग पॉइंट) ते जुन्या पुणे महामार्गावरील चौक जंक्शनला जोडणारा ३० किमी लांबीचा एक्सप्रेसवे बांधण्यास सुरुवात करणार आहे. हा नवीन कॉरिडॉर उरण-चिरनेर महामार्ग, गोवा महामार्ग आणि पुणे द्रुतगती मार्ग या मार्गांवरून जाईल, ज्यामध्ये मार्गावर अनेक ठिकाणी एन्ट्री आणि एक्झिट पाँइट आहेत.
या महामार्गावर एकूण 14 ठिकाणांहून वाहनांना प्रवेश करता येणार आहे. 14 वर्षांपूर्वी या एक्स्प्रेस वेच्या उभारणीचं काम सुरू करण्यात आलं होतं. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणामुळे पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. या महामार्गामुळे मुंबई आणि गोवा यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल. तसंच महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग प्रवासी आणि व्यापाऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणार आहे.
हा मगामार्ग नवी मुंबईतील पनवेलपासून सुरू होऊन रत्नागिरीमार्गे जाणार आहे. या महामार्गाचा 84 किमी लांबीचा पनवेल-इंदापूर विभाग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)कडून विकसित करण्यात येत आहे. तर, उर्वरित भागाचे रुंदीकरण सार्वजनिक विभाग करत आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.