Mumbai Torres Fraud: मुंबईत झालेल्या टोरस कंपनीच्या घोटाळ्यामुळं देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. गुंतवणुकदारांचे 500 कोटी घेऊन ही कंपनी एकाच दिवसांत गायब झाली आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस प्रकरणात शनिवारपर्यंत कंपनीच्या विविध शाखांमधून सुमारे 9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच कंपनीकडून बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणा-या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटविण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
टोरेसप्रकरणी दादरमधील कंपनीच्या शाखेत शोधमोहीम राबविण्यात आली आहे. कंपनीने 15 वाहने विकत घेतल्याचे आणि 5 वाहने आरक्षित केल्याचे पुरावे सापडलेत. आरोपींनी दादर येथे टोरेस कंपनीची शाखा सुरू करण्यासाठी प्रति महिना 25 लाख रुपये भाड्याने जागा घेऊन तेथे शो रूम उघडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी जागा मालकाकडे चौकशी करीत आहेत. मालकाने केलेला भाडेकरार, रकमेचा व्यवहार आदी तपशिलाची चौकशी केली जात आहे.
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने वाहने बक्षीस म्हणून दिल्याचे समजताच अधिकाऱ्यांनी ती स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांचा शोध सुरू केला. कंपनीकडून बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणाऱ्या १५ गुंतवणूकदारांची ओळख पटविण्यात आली असून या गाड्या जप्त कराण्याचा आर्थिक गुन्हे शाखा विचार करीत आहे, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.
5 जानेवारी रोजी टोरेसच्या शोरुममध्ये एका बैठकीत कर्मचारी आणि कंपनीच्या व्यवस्थापनात पगारावरुन वाद झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी शिवाजी पार्क पोलिसात धाव घेतली. त्यांच्यासोबत काही गुंतवणूकदारदेखील पोलीस स्थानकात पोहोचले आणि हे प्रकरण पुढं आलं. टोरेस प्रकरणात आत्तापर्यंत मुंबई, नवी मुंबईतील जवळपास अंदाजे सव्वा लाख गुंतवणुकदारांनी टोरेसमध्ये पैशांची गुंतवणुक केली असून काही जणांनी कर्ज काढून यात पैसे गुंतवले होते. तसंच, दादर, माहिममध्ये राहणाऱ्या अनेक व्यवसायिकांनी यात पैसे गुंतवले होते.