ज्यांना बोट धरून बाळासाहेबांनी मोठे केले, त्यांच्याच मुलाला त्रास दिला जातोय - नाना पटोले

 ज्या भाजपला बोट धरुन शिवसेने (Shiv Sena) अर्थात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मोठे केले, तेच त्यांच्या मुलाला त्रास देत आहेत, असा टोला भाजपला नाना पटोले यांनी लगावला.

Updated: Jun 21, 2021, 03:47 PM IST
ज्यांना बोट धरून बाळासाहेबांनी मोठे केले, त्यांच्याच मुलाला त्रास दिला जातोय - नाना पटोले title=

मुंबई : पुन्हा एकदा काँग्रेसने (Congress) स्वबळाचा नारा दिला आहे. सत्तेत राहणार पण स्वबळावर लढणार, असा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपलाही (BJP) फटकारले. ज्या भाजपला बोट धरुन शिवसेने (Shiv Sena) अर्थात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मोठे केले, तेच त्यांच्या मुलाला त्रास देत आहेत, असा टोला भाजपला त्यांनी लगावला.

 प्रतिआव्हान आणि चिमटा

दरम्यान, काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर अन्य राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आम्ही लढाईला तयार आहोत, असे प्रतिआव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे. तर कुणी कुणाला जोडे मारायचे हे त्यांनी ठरवावे, असा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. मात्र महाविकास आघाडीला 5 वर्षे साथ देणार, असे ते म्हणालेत. स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसने तयारीही सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

 हा शिवसेना पक्षाचा अंतर्गत प्रश्न!

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हा शिवसेना पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजप करत आहे. ज्या भाजपला बोट धरून शिवसेने बाळासाहेबांनी मोठे केले. त्यांच्याच मुलाला (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना) आज त्रास दिला जातोय, याचा आम्ही निषेध करतो, असे नाना पटोले म्हणाले.

'आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार'

काँग्रेसने कोरोना काळात सर्वात जास्त काम केले आहे. मी सामना वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही कोणाच्या टीकेकडे लक्ष देत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी युती केली तर आम्ही स्वागत करू त्यांनी लवकर जाहीर करावे, असे ते म्हणाले.

'ते जिलेटीन नागपूरमधून आले होते'

दरम्यान, पुलवामा आणि मुंबईत आलेले जिलेटीन नागपूरमधून आले होते. यावर भाजप का बोलत नाही, असा त्यांनी भाजपला सवाल विचारला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या विरोधी पक्ष नेत्यांची बैठक बोलावली आहे. यापूर्वी देखील त्यांनी अश्या बैठका घेतल्या आहेत. तसेच नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून वाद होणे दुर्दैवी आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारे नाही, असे ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष आमचाच असेल त्यासाठी लवकर निवडणूक घ्यावी अशी मी सूचना करणार आहे. या राज्यसरकारमध्ये आम्ही भाजपला विरोध म्हणून सामील झालो होतो, ही भूमिका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आधीच जाहीर केली होती. आम्ही सरकार सोबत आहोत हे सरकार पाच वर्षे चालेल, असे नाना पटोले म्हणाले.