पुणे : हिटलरने जे जर्मनीत घडवले तेच सध्या देशात घडवण्याचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथे केला. CAA, NRC हा संविधानावरचा हल्ला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच आपल्याला एकत्र आणले आहे. त्यामुळे आता आंबेडकर स्वीकारायचे की गोळवलकर हे आता देशाने ठरवायचे आहे, असेही ते म्हणालेत. NRC विरोधात पुण्यातील सारस बागेजवळ जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी आव्हाड यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.
#BreakingNews । हिटलरने जे जर्मनीत घडवले तेच सध्या देशात घडवण्याचा प्रयत्न मोदी आणि शाह यांच्याकडून होत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुणे येथे बोलताना केला. CAA, NRC हा संविधानावरचा हल्ला आहे, असे ते म्हणाले.https://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/vx6OX0EoCP
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 30, 2020
CAA ला विरोध करण्यासाठी महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या अहिंसेच्या मार्गानेच आपण पुढे गेले पाहिजे. इस्लाम खतरे में है, याऐवजी जेव्हा संविधान खतरे में है असे नारे ऐकू येतात, तेव्हा हा देश पुन्हा एकजूट होत असल्याची जाणीव होते, असे आव्हाड म्हणाले. यावेळेस आव्हाड यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावरही भाष्य केले. पोलीस सरकारच्या आदेशानेच चालतात. त्याचमुळे भीमा कोरेगाव हिंसाचार घडला, असा आरोपही आव्हाड यांनी केला.
दरम्यान, आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत ठिणगी पडल्याची चिन्हे दिसत होती. मात्र, आव्हाड यांनी सारवासारव करत आपले विधान चुकीचे पसरविण्यात आल्याचे म्हटले. मी इंदिरा गांधी यांचा समर्थक आहे, असे सांगत वादावर पडदा टाकला. मात्र, आजही त्यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत जे वक्तव्य केले. इंदिरा गांधी यांच्याबाबत जे काही वक्तव्य केले त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी रक्ताने सेक्युलर आहे. इंदिरा गांधी या महान नेत्या होत्या. त्यांच्याबाबत मी जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला, असंही आव्हाड यांनी म्हटले आहे.
रंगा आणि बिल्ला जोडीला घरी पाठवल्याशिवाय शांत राहणार नाही, असे वक्तव्य आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पुण्यात केले. आपण हिंदू किंवा मुसलमान म्हणून रस्त्यावर उतरलो तर यशस्वी होणार नाही. भारतीय म्हणून रस्त्यावर उतरलो तर यश नक्की मिळेल. १३० कोटी लोकसंख्येचा देश विरुद्ध भाजप, अशी लढाई आहे. ही लढाई आपल्या सर्वांची आहे, ते म्हणालेत. आज, उद्या आणि त्यापुढेही आपण नागरिक राहणार आहोत पण मोदीची आधी तुमच्या डिग्रीबद्दल बोला, असेही जिग्नेश मेवाणी यांनी म्हटलं आहे. CAA, NRC आणि NPR चा विरोध करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली. या सभेत जिग्नेश मेवाणी यांनी मोदींवर जोरदार टीका केली.