'मी तुमच्या भावाचा मुलगा' म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले 'उगाच भावनिक...'

Sharad Pawar on Ajit Pawar: अनेकांनी जाहीर सभेतून आम्हाला नाव आणि चिन्ह मिळेल असा दावा केला होता. त्यामुळे हा सेटलमेंट करुन निर्णय घेतल्याचं दिसत आहे अशी टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांवर केली आहे. तसंच अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामतीकरांना (Baramati) केलेल्या भावनिक आवाहनावरही भाष्य केलं.   

शिवराज यादव | Updated: Feb 17, 2024, 12:43 PM IST
'मी तुमच्या भावाचा मुलगा' म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले 'उगाच भावनिक...' title=

Sharad Pawar on Ajit Pawar: शरद पवार यांनी पक्षाचं नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाला देण्याचा विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. असा निर्णय होईल याची आम्हाला खात्री होती. त्याचं कारण विधानसभेचया अध्यक्षांनी पदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही. त्यांनी अपेक्षा होती तसाच निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या बाबतीतही त्यांना असाच निर्णय घेत, त्याची पुनरावृत्ती केली अशी टीका त्यांनी केली आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

"पक्ष आणि चिन्ह यांसंबंधी निवडणूक आयोग किंवा सभापतींनी जी भूमिका घेतली ती आम्हा लोकांवर अन्याय करणारी आहेत. पण पदाचा गैरवापर कसा होते ते यातून दिसत आहे. वरच्या कोर्टात जाणं हाच आमच्याकडे पर्याय होता. सुप्रीम कोर्टाला आम्ही निवडणूक जवळ असल्याने लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती करणार आहोत," अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. 

"पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याला देणं हे कधी घडलं नव्हतं. सगळ्या देशाला राष्ट्रवादीची स्थापना, उभारणी कोणी केली हे माहिती आहे. पण हे माहिती असतानाही पक्ष अन्य लोकांच्या हातात देणं हा अन्याय करणारा निर्णय आहे," अशी टीका शरद पवारांनी केली आहे. पुढे ते म्हणाले "अनेक लोकांनी जाहीर सभेतून आम्हाला नाव आणि चिन्ह मिळेल असा दावा केला होता. त्यामुळे हा सेटलमेंट करुन निर्णय घेतल्याचं दिसत आहे. अन्यायकारक निर्णय होईल याची आम्हाला कल्पना आली होती". 

'तुमच्याच भावाच्या पोटी जन्माला आलोय ना', अजित पवार पक्ष चोरला टीकेमुळे संतापले, 'वरिष्ठांचा मुलगा असतो तर...'

 

अजित पवारांनी बारामतीकरांना केलेल्या भावनिक आवाहनावर ते म्हणाले की, "आम्ही भावनात्मक आवाहन करण्याचं कारण नाही. बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्षं ओळखतात. त्यामुळे आम्हाला त्याची गरज नाही. पण ज्याप्रकारे यांच्याकडून भूमिका मांडली जात आहे त्यातून वेगळं सुचवलं जात आहे. जनता त्यासंबंधी योग्य निर्णय येईल याची मला खात्री आहे".

दरम्यान अजित पवारांनी आपल्याला एकटं पाडलं जात असल्याचा आरोप केला आहे. त्यावर ते म्हणाले की "निवडणुकीत मतदारांशी साथ जोडण्यासाठी त्यांनी हे केलं असावं. पण कुटुंबातील सर्व लोक एका बाजूला आणि मीच एकटा सांगणं आहे सांगणं म्हणजे सतत भावनात्मक भूमिका मांडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसत आहे". मला अनेक कार्यकर्त्यांनी फोन येतात, दमदाटी केली जात आहे असं सांगितलं जात आहे. बारामती मतदारसंघात पहिल्यांदाच अशा गोष्टी होत आहेत अशी खंतही शरद पवारांनी व्यक्त केली. 

जितेंद्र आव्हाडांनी पवार कुटुंबात फूट पाडल्याच्या धनंजय मुंडे यांच्या आरोपावर ते म्हणाले की, "राष्ट्रवादीत त्यांचा जो कालखंड आहे त्यापेक्षा अधिक काळ जितेंद्र आव्हाड पक्षासाठी काम करत आहेत. त्यांनी देशतापळीवर काम केलं आहे, देशातील तरुणांचं नेतृत्व केलं. राज्य मंत्रिमंडळातही त्यांनी काम केलं आहे. पक्षाची भूमिका मांडणं त्यांचा अधिकार आहे. त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं याचं मार्गदर्शन इतरांनी करण्याची गरज नाही". 

सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सूनेत्रा पवार लढतीवर ते म्हणाले की, "लोकशाहीत निवडणुकीला उभं राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो अधिकार कोणी गाजवत असेल तर आम्ही तक्रार करण्याचं कारण नाही. आपण आपली भूमिका लोकांसमोर मांडत राहायला हवी. 55-60 वर्षं आम्ही काय काम केलं हे लोकांना माहिती आहे". शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी दिली याचं मला आश्चर्य वाटत असल्याचंही ते म्हणाले.