स्थानिक भूमिपुत्रांविषयी सरकारचं पुतना मावशीचं प्रेम, भाजपची टीका

दरेकरांची राज्य सरकारवर टीका

Updated: May 11, 2020, 07:39 AM IST
स्थानिक भूमिपुत्रांविषयी सरकारचं पुतना मावशीचं प्रेम, भाजपची टीका title=

मुंबई : एकीकडे परप्रांतीय मजुरांना मोफत प्रवास देणाऱ्या सरकारचं स्थानिक भूमिपुत्रांविषयी पुतना मावशीचं प्रेम उघड झाल्याची टीका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली आहे. परप्रांतीय मजुरांना रेल्वेने मोफत नेण्याची मागणी करणारे आता स्थानिकांना एस टी ने मोफत का नेऊ शकत नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. 

राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार एसटी बसची मोफत प्रवास सेवा पूर्ण राज्यातील प्रवासासाठी नाही इतर राज्यातील महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेल्या मजूरांना महाराष्ट्र आणि त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहचवण्यासाठी आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर राज्यात अडकलेले मजूर जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठी ही सेवा आहे. या मुद्द्यावरुन दरेकरांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. 

राज्यभरातील प्रवासासाठी एसटी सेवा मोफत असेल. त्यासाठी ११ मे पासून बुकिंग सुरु होईल, असे सांगितले गेले. मात्र, काही तासांतच सरकारने घुमजाव करत हा निर्णय फिरवला. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले. 

हे वाचा : एसटी सर्वांना मोफत नाही; परिवहन मंत्र्यांनाच अंधारात ठेवून निर्णयात बदल

लोकांनी पैसे देऊन गावी जाण्याची तयारी केली तरी सरकारी आदेश आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये तफावत आहे. सरकारी आदेशात केवळ मजूर आणि अडकलेल्या लोकांनाच गावी सोडले जाईल, असे म्हटले आहे.

मात्र, शहरातील अनेक नागरिक आता आपल्यालाही गावी जायला मिळणार या आनंदात आहेत. याबाबत सरकारने अजूनही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.