पालघर : पालघरच्या गडचिंचले गावात गावकऱ्यांनी साधुंसह तिघांची ठेचून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेवरून राजकारणही जोरात पेटलं असून राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. तसेच या घटनेवरून सोशल मीडियावरून ठाकरे सरकारलाही टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिला आहे.
भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी ट्वीट करून कम्युनिस्टांवर थेट आरोप केला आहे. सुनील देवधर ट्वीटमध्ये म्हणतात, भारतातील कोणताही आदिवासी वर्षानुवर्षे ब्रेनवॉश झाल्याशिवाय भगवाधारी व्यक्तीवर हल्ला करूच शकत नाही. झुंडशाहीचा प्रकार घडला तो पालघरचा भाग कम्युनिस्टांचा बालेकिल्ला आहे. भाजपचा स्थानिक आमदारही सीपीआयएमचा आहे. उद्धव ठाकरेंच्या अराजक राजवटीत मार्क्सवादी गुंडांनी दोन धार्मिक साधुंचे बळी घेतले ही भयानक झुंडशाही आहे.
No adivasi in India can attack a saffron clad person unless brainwashed over years.
The #palgharlynching area is a communists’ bastion, even the Local (Dahanu) MLA belongs to @cpimspeak.
Horrific #moblynching of 2 pious seers by Marxist goons in anarchy rule of @OfficeofUT pic.twitter.com/LMJ0SXCKuP— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) April 20, 2020
दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर आरोप केले आहेत. कोरोनाच्या वेळी भाजप घृणास्पद राजकारण करत आहे. अटक झालेले अनेक लोक भाजपशी संबंधित आहेत, असा आरोपही सावंत यांनी केला आहे. भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे ज्या गावात साधूंसह तिघांची मॉबलिंचिंग झाली त्या दिवशी गडचिंचले गावच्या सरपंच म्हणून निवडून आलेल्या श्रीमती चित्रा चौधरी यांचा सत्कार करताना.... अशी भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांची जुनी फेसबुक पोस्ट सचिन सावंत यांनी ट्वीट केली आहे. अमित शहा यांनी विचारावे की अफवा थांबवण्यासाठी तुम्ही काय केले? भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखले का नाही? असा सवाल सावंत यांनी केला आहे.
भाजपाचे माजी आमदार पास्कल धनारे ज्या गावात साधूंसह तिघांची मॉबलिंचिंग झाली त्या "दिवशी गडचिंचले" गावच्या सरपंच म्हणून निवडून आलेल्या श्रीमती चित्रा चौधरी यांचा सत्कार करताना! अमित शहा यांनी विचारावे की अफवा थांबविण्यासाठी तुम्ही काय केले? भाजपाच्या कार्यकर्त्यांना रोखले का नाही? pic.twitter.com/EyxF4IBtE7
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 20, 2020
अमित शाह बांद्र्याची घटना झाल्यावर @OfficeofUT ना फोन करतात पण सुरतबद्दल @vijayrupanibjp ना फोन नाही. पालघर माॅबलिचिंगच्या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा उध्दवजींना फोन पण @myogiadityanath च्या राज्यात अनेक घटना झाल्या त्यांना फोन का नाही? राज्य सरकारला बदनाम करण्याचा #भाजप चा डाव आहे. pic.twitter.com/gaNcBMpEw4
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 20, 2020
पण हा फोटो २०१६ चा आहे. पास्कल धनारे यांना विचारले असता या घटनेच्या आधी बरेच दिवस त्या गावात गेलो नव्हतो, असं त्यांनी सांगितले. गडचिंचले गावात भाजपच्या चित्रा चौधरी सरपंच आहेत. या घटनेनंतर गावात जाऊन माहिती घेतली असं धनारे यांनी सांगितले. चोर आल्याची अफवा पसरली होती. त्यातूनच गावकरी जमले आणि हा प्रकार घडला अशी माहिती गावकऱ्यांनी दिल्याचे धनारे सांगतात. गडचिंचले गावातीलच नव्हे तर आजूबाजुच्या गावातील लोक तिथे जमा झाले आणि त्यांनी हल्ला केला, अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळाल्याचं धनारे यांनी सांगितले.
कम्युनिस्ट पक्षाचे लोक अफवा पसरवण्याचं काम करतात असा आरोप धनारे यांनी केला. या गावात भाजप, कम्युनिस्ट आणि राष्ट्रवादी अशा तीनही पक्षांचे कार्यकर्ते आहेत. भाजपचे कार्यकर्ते कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. हल्लेखोर कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का याबाबत थेट आरोप करण्याचं त्यांनी टाळलं. घटना घडली तिथे वनखात्याचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे सखोल चौकशी झाली तर सत्य समोर येईल, असं धनारे म्हणाले.
या भागाचे जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेचे सभापती काशिनाथ चौधरी घटना घडली तेव्हा पोलिसांबरोबर घटनास्थळी होते. ते म्हणाले, ‘गावात हा प्रकार सुरु आहे कळलं तेव्हा पोलिसांनी मला फोन करून बोलावलं. पोलिसांच्या तीन गाड्या आणि आपली गाडी अशा चार गाड्या घेऊन आम्ही पोहचलो तेव्हा मोठा जमाव जमला होता. कोयते, कुऱ्हाड अशी हत्यारे त्यांच्या हातात होती. पोलीस आणि आम्ही जमावाला अडवण्याचा आणि साधुंना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. माझ्या गाडीवर दगडफेक केली. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यात सगळं चित्रिकरण आहे. त्यामुळे सर्व सत्य समोर येईल.’
भाजपने कम्युनिस्ट कार्यकर्त्यांवर केलेल्या आरोपांबाबत विचारले असता चौधरी म्हणाले, ‘या घटनेशी राजकारणाचा काहीही संबंध नाही. भाजप याला राजकीय रंग देऊन घाणेरडे राजकारण करत आहे. सर्वच पक्षाचे कार्यकर्ते गावात आहेत. पण हा प्रकार राजकीय नव्हता. आम्ही गेले तेव्हा भाजपच्या असलेल्या सरपंच तेथे होत्या आणि त्या जमावाला रोखण्याचा प्रयत्न करत होत्या. मग पोलिसांनी आणि आम्हीही प्रयत्न केला. पण जमाव कुणाचंच ऐकत नव्हता.’
या भागाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.