गजानन देशमुख झी मीडिया, परभणी : घरात लहान मुलांकडे लक्ष दिलं नाही तर ते काहीना काही उद्योग करत असतात. मात्र महाराष्ट्रातील परभणीतील लाखांदूर तालुक्यातील सरांडीमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला आहे. सान्वी छत्रपाल मृत मुलीचं नाव आहे.
नेमकं काय घडलं?
सान्वी घराशेजारील आपल्या मित्रांसोबत खेळत होती. मुलगी बाहेर खेळत असल्याने तिची आई घरकामात व्यस्त होती. घरातील काम आटोपल्यानंतर सान्वीला पाहण्यासाठी तिची आई बाहेर आली. मात्र तिला सान्वी कुठेही दिसली नाही मग त्यांनी शोधाशोध सुरू केली.
सान्वी कुठेच दिसली नाही मात्र ज्या ठिकाणी आणि ज्या अवस्थेत दिसली ते पाहून तिच्या आईच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण शेजाऱ्यांच्या अंगणातील पाण्याच्या टाकीमध्ये पडलेली होती. सान्वीला बाहेर काढण्यात आलं मात्र नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, सान्वीला टाकीतून बाहेर काढल्यानंतर लगोलग सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर लाखांदूर येथील ग्रामीण रूग्णालयात नेलं होतं. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. सान्वीच्या दुर्देवी मृत्युने छत्रपाल कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.