ठाणे : ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयातल्या मानसोपचारतज्ज्ञ विभागात गेल्या आठ महिन्यांपासून तज्ज्ञ डॉक्टरांचं पद रिक्त आहे. त्यामुळं रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. मानसोपचार विभागात उपचारांसह विविध मानसिक आजारांवरील समुपदेशन केले जाते. तसेच मानसिक आजारांबाबत प्रमाणपत्र देण्याची तरतूदही याच विभागात असल्याने डॉक्टर हजर असणे गरजेचे असते. रुग्णालयात पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध नसल्याने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील डॉक्टरांना आठवड्यातून एक दिवस सिव्हिल रुग्णालयात सेवा द्यावी लागते.
अनेकांना मनोरुग्णालयातील ओपीडीबाबत माहिती नसल्याने रुग्णांची उपचारांसाठी शोधाशोध सुरूच असते. सिव्हिल रुग्णालयातील मानसिक आरोग्य समाजिक कार्यकर्त्यांकडून हे सहकार्य केले जात असले तरी प्रत्यक्षात सध्याच्या पद्धतीचा रुग्णांना फायदा होत नसल्याचं सांगण्यात येतं आहे.