मुंबई : हिवाळ्यात देखील अवकाळी पाऊस झाल्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. रेणापूर, शिरूर अनंतपाळ, उदगीर तालुक्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा काढणीला आलेल्या हरभरा पिकांचे नुकसान होत आहे.
त्याचप्रमाणे जालना येथील अंबड तालुक्यातील वडीगोद्री शिवारात मुसळधार पाऊस झाला. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी या भागात पावसाची रिमझिम सुरूच आहे.
पंढरपूरमध्ये देखील उपरी परिसरात अवकाळी पाऊसामुळे डाळींब, गहू पिकाचे नुकसान झाले आहे. सांगलीतील मिरज शहर परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आता या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
याआधी काही महिन्यांपू्र्वी, अवकाळी झालेल्या पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं. कापूस भिजला होता, तूर, हरभरा पिकांवरही पावसाचा परिणाम झाला होता. शेतकऱ्यांचं हाती आलेलं पीक वाया गेलं होतं. कापूस, तूर या खरीप पिकांसह रब्बीतील चणा, गहू, कांदा यासह भाजीपाला यांना पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला होता.
वादळी पाऊसामुळे भाजीपाला पिकाचं नुकसान झालं. यामध्ये कांदा, पालक, मेथी आदी पिकांना वादळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. शेतकऱ्याला आधीच्या नुकसानीची भरपाई मिळाली नसतानाच पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यावर संकट कोसळलं आहे.