पिंपरी-चिंचवड : पिंपरीकरांना थेट ढगातून स्ट्रॉद्वारे पाणी मिळणार आहे. शहरात मेट्रो, बी आर टी ची कामं सुरु असल्याने रस्ते अरुंद झालेत. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना घराजवळच्या नगरसेवकांच्या कार्यालयातून काम करता येणार आहे. तर पुण्यात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टर दिले जाणार आहे. आश्चर्य वाटतंय ना पण हे सगळं खरं आहे. तसा प्रस्ताव महापालिकेत मंजूरही करण्यात आलाय.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत थेट ढगातून स्ट्रॉ द्वारे पाणी पोहचवण्याचा हा अजब ठराव कसा मांडला गेला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण थांबा... ही सर्वसाधारण सभा असली तरी ती अभिरूप सभा आहे. महापालिकेच्या वर्धापन दिनाला दरवर्षी पालिकेत आयुक्तांसह प्रशासन अधिकारी महापौर नगरसेवकांच्या भूमिकेत असतात तर नगरसेवक हे महापौर, आयुक्त आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेत असतात आणि या सभेत असे भन्नाट विषय मंजूर केले जातात.
पाण्याचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर अधिकाऱ्यांना अरुंद रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासाकडे नगरसेवकांनी लक्ष वेधत , अधिकारी कर्मचार्यांना घराजवळच्या नागरसदस्यांच्या कार्यलयातून काम करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला...! काही कर्मचारी पुण्यात राहत असल्यामुळे त्यांच्यासाठी उपसूचना ही देण्यात आली... त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला...
या विषयाला आणखी एक उपसूचना मिळाली... महापालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कॅन्टीन ची सोया करण्याची...! आयुक्तांनी ही सर्व विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व विषय मंजूर करून टाकले...! राहुल जाधव हे आयुक्तांच्या भूमिकेत होते.
या ऐतिहासिक सभेची सुरुवात झाली ती आवाज वाढवं डी जे या गाण्याने तर शेवटही भन्नाट झाला...! एकूणच काय तर सर्वसाधारण सभा म्हंटलं की तणावात असलेल्या सर्वांनाच ही थोडासा ताण हलकी करणारी ही अभिरूप सभा ठरली...!